पक्षांतर्गत कुरबुरींमुळे शिवसेनेत फेरबदलाचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत आहे. म्हणूनच इतकी वर्षे या पदावर राहिलो. संघटनेत पदाधिकारी बदलाचे आदेश ‘मातोश्री’वरून घेण्यात येतात. सध्या तरी बदलाच्या हालचालींची माहिती नाही; पण पक्षप्रमुख घेतील तो आदेश मान्य आहे.
- प्रमोद पवार, तालुकाप्रमुख, संगमेश्‍वर

रत्नागिरी, चिपळूणनंतर संगमेश्‍वरमध्ये हालचाली - नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता

देवरूख - पक्षांतर्गत कुरबुऱ्यांमुळे संगमेश्‍वर तालुका शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. तालुकाप्रमुख पदासह अन्य पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे. याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदार विनायक राऊत यांच्याकडे देण्यात आले आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीपासून तालुका शिवसेनेत दोन गट निर्माण झाले होते. यातील एका गटाने थेट आमदार सदानंद चव्हाण यांच्या विरोधात उघडपणे काम केले होते. निवडणुकीनंतर काही काळ हा गट संघटनेपासून बाजूला होता. नंतर तो मुख्य प्रवाहात आणण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. यातून पुन्हा संघटनेत अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. जुन्यांना संधी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी देत तालुका संघटनेला नवीन रूप देण्याची मागणी एका गटाची आहे. यानुसार तालुका कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याचे शिवसैनिकांमध्ये उघडपणे बोलले जात आहे. मध्यंतरी तालुकाप्रमुख बदलावरून शिवसेनेत घमसान रंगले होते. नंतरचा काही काळ हा प्रकार शांत झाला होता. आता रत्नागिरी तालुका शिवसेनेत फेरबदल झाल्यानंतर चिपळूणच्या तालुकाप्रमुखपदीही नव्या व्यक्‍तीची निवड करण्यात आली आहे. आगामी मध्यावधी निवडणुकांची हवा पाहता आता संगमेश्‍वरचा नंबर लागण्याची शक्‍यता आहे. 

प्रमोद पवार हे गेली २० वर्षे तालुका शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्यांच्या काळात संघटनेवर २००६ आणि २०१० मध्ये मोठे आघात झाले; मात्र त्यांनी पक्षबदल न करता शिवसेनेशी इमानदार राहत संघटना वाचविण्याची मोठी कामगिरी केली आहे. असे असतानाही संघटनेतील नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्यासाठी हा बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्‍यातील महिला सदस्याला जिल्ह्याचे मोठे पद मिळणार असल्याचीही चर्चा आहे.

तालुकाप्रमुख पदासाठी देवरूख आणि साखरप्यातील दोघांची नावे चर्चेत आहेत. अन्य पदांमध्येही फेरबदल होण्याचे संकेत आहेत. संगमेश्‍वर तालुका शिवसेनेत बदल करण्याचे अधिकार हे आमदार सदानंद चव्हाण यांच्याप्रमाणे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्याकडे असून त्यावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदार विनायक राऊत यांच्याकडे देण्यात आल्याने आगामी काळात संघटनेत बदल होणार का याकडे शिवसैनिकांचे डोळे लागून 
राहिले आहेत.