साखरप्यात आज श्‍वान शर्यतीचा थरार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

देवरूख - साखरपा येथील श्री स्वामी समर्थ रेसिंग क्‍लबच्या वतीने कोकण विभागात प्रथमच साखरपा येथे शनिवारी (ता. ४) राज्यस्तरीय महाराष्ट्र व पंजाब ग्रेहाँड श्‍वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुकावासीयांना प्रथमच विविध जातींच्या श्‍वानांची शर्यत पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

सकाळी अकरा वाजता ही शर्यत केदारलिंग मंदिर भडकंबा येथे रंगणार आहे. शर्यतीसाठी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, कॅनल क्‍लब देवरूख, लायन्स क्‍लब संगमेश्‍वर यांचे सहकार्य लाभणार आहे. या शर्यतीतील प्रथम विजेत्या श्‍वानाला १५ हजार रुपये व चांदीची गदा, द्वितीय विजेत्याला ९ हजार व आकर्षक चषक, तृतीय विजेत्याला ७ हजार व चषक, चतुर्थ विजेत्याला ५ हजार व चषक, पाचव्या विजेत्याला ३ हजार व चषक, सहाव्या विजेत्याला २ हजार व चषक तसेच स्पर्धेतील सातवा, आठवा, नववा आणि दहावा क्रमांक येणाऱ्या श्‍वानाला प्रत्येकी १ हजार रोख आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. 

कोकणात आजपर्यंत केवळ प्राण्यांमधील बैलगाडी शर्यती लोकप्रिय आहेत; मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने बैलगाडी शर्यती बंद आहेत. त्यामुळे श्‍वान शर्यत रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. कोकण विभागात अशा शर्यती आजपर्यंत झालेल्या नाहीत. मुंबई, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात श्‍वान शर्यती रंगतात. कोकणातील रसिकांना तेथपर्यंत जाता येत नाही. तालुक्‍यातील श्‍वानप्रेमींसाठी विविध जातींचे श्‍वान एकत्र पाहण्याची संधीही या निमित्ताने मिळणार आहे. शर्यतीला उपस्थित राहावे, असे आवाहन रेसिंग क्‍लबचे अध्यक्ष प्रताप सावंत यांनी केले आहे.