रत्नागिरीमधील सेवेत डॉ. शिंदे दोन वर्षे गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

रत्नागिरी - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शासकीय सेवेत सतत गैरहजर राहून एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दौंड (जि. पुणे) येथे वेगळेच प्रताप केल्याचे पुढे आले आहे. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे याला गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी पुण्यात अटक झाली आहे. कारवाईबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला माहिती मिळाली असून, संबंधित डॉक्‍टरची शासकीय सेवा रद्द करावी, असा अहवाल शासनाला दिल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ (जि. सांगली) येथील भ्रूणहत्याकांड उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्या पाठोपाठ दौंड (जि. पुणे) येथे आणखी एक प्रकार उघड झाला. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे, औतारी, आटोळे यांना बिरोबाची वाडी येथे तीन महिलांचे सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान करताना ताब्यात घेतले होते. पुढील तपासासाठी त्यांना अटक करून न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. डॉ. शिंदे याच्यावर झालेल्या या कारवाईनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्याच्याबाबतचा सर्व अहवाल शासनाला सादर केला आहे. डॉ. शिंदे या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

डॉ. मधुकर शिंदे रत्नागिरीत शासकीय सेवेत आहे; मात्र गेली दोन वर्षे तो येथे गैरहजर आहे. 2015मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत हजर झाला; मात्र त्यानंतर तो सतत गैरहजर राहू लागला. रुग्णालयाने त्याला हजर होण्याबाबत वारंवार नोटिसा पाठवल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.