शेतकरी समृद्ध झाल्यास देशात समृद्धी - डॉ. विजय भटकर

शेतकरी समृद्ध झाल्यास देशात समृद्धी - डॉ. विजय भटकर

सिंधुदुर्गनगरी - ""शेतकरी समृद्ध झाल्यास देश आपोआप समृद्ध होईल,'' असे प्रतिपादन सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी आज येथे केले. सिंधू कृषी ऍग्रो फेस्ट व कृषी प्रदर्शनानिमित्ताने आयोजित भारत कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा येथील जिजामाता कृषीनगरी येथे पद्मभूषण डॉ. विजय भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, सारस्वत बॅंकेचे संचालक एस. व्ही. सौदागर, शास्त्रज्ञ रमेश ठाकरे, के. आर. भाट, मंगेश देशमुख, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रा. भावना पाताडे, सचिव दीनानाथ वेरणेकर, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या वेळी जिल्ह्यात विविध शेती प्रकारात उल्लेखनीय प्रगती साधलेल्या सुमारे शंभरहून अधिक शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

या वेळी डॉ. भटकर यांनी या सिंधू कृषी ऍग्रो फेस्ट निमित्ताने येथे लावलेल्या स्टॉलना भेटी दिल्या. येथील शेती प्लॉटची पाहणी करत समाधान व्यक्त केले. 

या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय ओरोस यांच्यामाफत दरवर्षी कृषी क्षेत्रासह आधुनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो. तो या संस्थेने या वर्षी भारत कृषिरत्न पुरस्कार परम कॉम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार सन्मानपूर्वक आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. 

या वेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले,""सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच पीक घेण्याची सवय शेतकऱ्यांना आहे. एकच पीक सगळीकडे असल्याने त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आपल्या कृषी प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादनासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थिरता स्थापन करण्यासाठी शासनाने समृद्ध किसान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे करीत असताना येथील शेतकऱ्यांनी समूह शेतीकडे वळावे.'' 

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य ऑनलाइन खरेदी करावे. या ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या शेतीविषयक माहितीचा शेतकऱ्यांनी अवलंब करून शेती करावी असे सांगतानाच जेव्हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करून शेती करेल तेव्हाच खरा येथील शेतकरी समृद्ध होईल असे सुधीर सावंत म्हणाले. 

श्री. सौदागर म्हणाले,""शेती पिकांची मागणी वाढत आहे; मात्र हे पीक घेणारी शेतजमीन कमी होत आहे; परंतु शिल्लक असलेल्या जमिनीचा कस वाढवून आणि आधुनिक पिके घ्यावी त्यासाठी लागेल ती मदत आम्ही करू.'' 

पद्मभूषण डॉ. भटकर म्हणाले,""भारत कृषिप्रधान देश असल्याने हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी आपण महासंगणकाची निर्मिती केली. आता या संगणकाच्या माध्यमातून आधुनिक शेती करण्याकडे विशेष भर दिला जात आहे. आपली संस्कृती ही ज्ञानाधिकृष्ट संस्कृती आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि देशाला समृद्ध करायचे असेल तर पहिले शेतकऱ्याला समृद्ध केले पाहिजे. शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासनाबरोबरच जिल्हा कृषी प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.'' 

शेतकऱ्यांपर्यंत संगणकीय ज्ञान पोचले व तो या ज्ञानाचा परिपूर्ण वापर करायला शिकला, तर येणाऱ्या 2040 मध्ये भारत देश हा कृषी क्षेत्रातील सर्वांत समृद्ध देश असेल असा विश्‍वासही डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. 

शेतकरी समृद्ध झाल्यास पुरस्काराचे समाधान 
आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यात कृषी क्षेत्रातील मिळालेला हा भारत कृषिरत्न पुरस्कार या मुळे मी आनंदी आहे; मात्र ज्या वेळी देशातील शेतकरी समृद्ध होईल त्या वेळीच आपण हा पुरस्कार मिळाल्याचे समाधान व्यक्त करणार असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com