फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर खासगी माहिती टाळावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

चिपळूण : "फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर अनेक वेळा तरुणाईकडून आपली खासगी माहिती टाकली जाते. त्याद्वारे गैरफायदा घेतला जाऊ शकतो. मुलींच्या बाबतीत कॉमेंट, मेसेज, सातत्याने कॉल येण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुलींनी अशा माध्यमांमध्ये आपली खासगी माहिती टाकणे टाळावे. गैरप्रकाराची कल्पना पालकांना द्यावी. पालकांनी पोलिसांना माहिती दिल्यास वेळीच हे प्रकार रोखता येतील,‘‘ असे प्रतिपादन सायबर क्राइम विषयांतील तज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव पाणिंद्रे यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या पाग महिला विद्यालय येथे राष्ट्रवादी जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने सायबर क्राइमवर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइमविषयी जागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये नाहक त्रास देणारे गुन्हेगार कितीही हुशार असले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. मुलींनी इंटरनेटचा जागरूकतेने वापर करावा. तसेच मुलींना वारंवार कॉल आल्यास त्याची कल्पना देणे गरजेचे आहे, असे डॉ. पाणिंद्रे यांनी सांगितले.

सायबर क्राइमच्या जाळ्यात अडकून अनेक तरुणींचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या वाटेवर असणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये इंटरनेटबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी महिला कॉंग्रसतर्फे विविध शाळांमध्ये सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, परिविक्षाधिन उपनिरीक्षक दीपिका मुसळे, राष्ट्रवादी चिपळूण शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, महिला तालुकाध्यक्षा मानसी कदम, शहराध्यक्षा दीपिका कोतवडेकर, आदिती देशपांडे, पी. एस. नलावडे, स्वप्नाली कराडकर, साहिल पाणिंद्रे, तेजस्विनी संकपाळ आदी उपस्थित होते.