विदेशी पर्यटकाच्या मोटारीच्या धडकेत कारिवडेत रिक्षाचा चक्काचूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नशेच्या संशयाने रक्तचाचणी
संबंधित गाडी चालविणारा रशियन पर्यटन अमली पदार्थाच्या नशेत असल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरा रक्ततपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उशिरापर्यंत त्या ठिकाणी तपासणी सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

सावंतवाडी - प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला धडक देऊन आंबोलीच्या दिशेने पलायन करणाऱ्या रशियन पर्यटक जोडप्याला भारत भ्रमंती चांगलीच महागात पडली. रिक्षाचे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कारिवडे येथे कचरा डेपोच्यासमोर घडला. यात नेहा राऊळ (वय 35), सुशीला धोत्रे (वय 48), संगीता मंजाळ (वय 25) व प्रथम मंजाळ (वय 1, सर्व रा. कारिवडे) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर येथील कुटिर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. सायंकाळी उशिरा पोलिस ठाण्यात या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला.

येथील गांधी चौकात रिक्षा व्यवसाय करणारे सत्यवान बुधाजी परब (रा. माजगाव) कारिवडे येथील भाडे घेऊन सोडण्यासाठी जात होते. कारिवडे नगरपालिका कचरा डेपोजवळ गेले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या रशियन पर्यटक लेबिट ऍन्ड्री यांच्या मोटारीने डाव्या बाजूने रिक्षाला धडक दिली. यात रिक्षा रस्त्यावरून बाजूच्या गटारात पलटी झाली. आपल्या गाडीमुळे अपघात झाला, हे लक्षात आल्यानंतरही पर्यटकाने त्या ठिकाणी न थांबताच आंबोलीच्या दिशेने पलायन केले.
पर्यटकांच्या गाडीची धडक बसताच रिक्षा तीन वेळा पलटी मारून रस्त्याच्या डाव्या बाजूला गटारात पलटी झाली. यात रिक्षाचा चक्काचूर होऊन आतील सुशीला धोत्रे, नेहा राऊळ व संगीता मंजाळ हे प्रवासी किरकोळ जखमी झागले. नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

दरम्यान, पोलिस घटनास्थळी आले. अपघात करून पलायन केलेल्या विदेशी पर्यटक लेबिट ऍन्ड्री व त्याच्या मैत्रिणीला आंबोली पोलिस चेक पोस्ट येथे मोटारीसह ताब्यात घेत येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या वेळी रिक्षाचालकाच्या बाजूने पोलिस ठाण्यात लोकांनी मोठी गर्दी केली. अपघात झालाच नाही, असे तो विदेशी पर्यटक सांगत होता; मात्र पंचनाम्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नशेच्या संशयाने रक्तचाचणी
संबंधित गाडी चालविणारा रशियन पर्यटन अमली पदार्थाच्या नशेत असल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरा रक्ततपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उशिरापर्यंत त्या ठिकाणी तपासणी सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

Web Title: foreign tourist accident in sawantwadi