गौतमी नदीचे पात्र पुन्हा गाळाने भरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पावस - पावसची जीवनरेषा समजली जाणारी गौतमी नदी पुन्हा गाळात रुतत चालली आहे. नदी गाळातून मुक्त करण्यासाठी तयार केलेल्या समितीचे तीन वर्षाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. 

पावस - पावसची जीवनरेषा समजली जाणारी गौतमी नदी पुन्हा गाळात रुतत चालली आहे. नदी गाळातून मुक्त करण्यासाठी तयार केलेल्या समितीचे तीन वर्षाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. 

गेली अनेक वर्षे गाळात रुतलेली गौतमी नदीला श्‍वास घेता यावा यासाठी औरंगाबादचे स्वामीभक्त माधव हरी कानडे यांनी पुढाकार घेऊन चळवळ उभी राहण्याच्या दृष्टीने तीन वर्षाकरिता एक समिती तयार करून त्याच्या माध्यमातून व लोकसहभागातून निधी जमा करून गाळ उपसण्याचा संकल्प करण्यात आला. पहिलीच वेळ असल्याने सर्वांनी उत्साह दाखवला. त्याला काही प्रमाणात शासनाची साथ मिळाली. ग्रामपंचायत ते बळगे स्मशानभूमी असा दोन किमीचा परिसर खोदण्यात आला. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. पाण्याचे स्त्रोतही मोकळे झाले होते. पहिल्या टप्प्याचे काम करण्यात आले. हा गाळ गौतमी किनारीच टाकल्यामुळे पावसाळ्यात ५० टक्के गाळ किनाऱ्यावरून पात्रात येऊन पडला आहे. तो पात्राबाहेर जाणे गरजेचे होते; परंतु तसे घडले नाही. 

राज्यात अनेक ठिकाणी पाणी समस्येवर मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था व ग्रामस्थ लोकसहभागातून नद्याचा गाळ उपसण्याचे व पाण्याचे स्रोत बळकट करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले जात आहे. जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईवर मात करता येईल. 

पावसाळ्यात मागील वर्षात औरंगाबादच्या स्वामीभक्ताने पाण्याचे महत्त्व पटवून व त्याचे नियोजन दिले; परंतु दुसऱ्या वर्षी या कामाकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे नदीपात्रात पुन्हा गाळ साचला आहे.