मुलींच्या जन्मदरातील घसरण कायम 

मुलींच्या जन्मदरातील घसरण कायम 

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमावर भर दिला जात असतानाही जिल्ह्यात मुली जन्माचे प्रमाण घटत चालले असल्याचे गेल्या नऊ महिन्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 6228 बालकांचा जन्म झाला. त्यामध्ये 3233 मुलगे तर 2995 एवढ्याच मुली जन्माला आल्या आहेत. मुलांपेक्षा 238 मुली कमी जन्मल्या असल्याचे समोर आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यामध्ये राज्यात आघाडीवर असून या जिल्ह्यात दरवर्षी कुटुंब कल्याण योजनेचे उद्दिष्टही 100 टक्के पूर्ण केले जाते. जिल्ह्याचा जन्मदरही घसरला असून राज्याच्या जन्मदराच्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जन्मदर कमी आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदीचेही प्रमाण जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे वाढत आहे. जिल्ह्यातील स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण राबविले जात आहे, तर मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शासनाकडून विविध सवलतींच्या योजना राबविण्यात येत आहेत. तरीही जिल्ह्याच्या मुले-मुलींच्या जन्म प्रमाणात अद्यापही विषमता दिसून येत आहे. 

जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ग्रामीण कर्मचारी आरोग्य सेविकांमार्फत प्रत्येक गरोदर महिलेची नोंदणी केली जाते. तिच्या आरोग्याची काळजी घेतानाच तिची प्रसूती होईपर्यंत विविध चाचण्या व आरोग्यसेवा पुरविल्या जातात. असे असतानाही एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 या नऊ महिन्यांचा अहवाल घेतला असता प्रत्येक महिन्यात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण मुलांपेक्षा कमीच असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 पर्यंत जन्माला आलेल्या एकूण 6228 नवजात बालकांमध्ये 3233 एवढे मुलगे तर 2995 एवढ्या मुली जन्मल्या आहेत. गेल्या नऊ महिन्यांत मुलांपेक्षा 238 मुली कमी जन्मल्या आहेत. डिसेंबर 2016 या महिन्यात जन्मलेल्या एकूण 675 बालकांमध्ये 351 मुलगे तर 324 मुली जन्मल्या असून मुलांपेक्षा 27 मुली कमी जन्मल्या आहेत. यावरून जिल्ह्यात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्त्री-भ्रूणहत्या होत नसल्याचा दावा 
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्या होत नसल्याचा दावा केला जात असला तरी जन्माला येणाऱ्या बालकांमधील मुलींची संख्या पाहता जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्या होते का, याबाबत आजही संभ्रम निर्माण होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला यापुढे अधिक खबरदारी घेण्याची आवश्‍यकता असून जिल्ह्यातील गरोदर महिलांचे प्रमाण, प्रसूती होणाऱ्या महिलांचे प्रमाण आणि जन्मलेल्या मुलांची संख्या याचा ताळमेळ घालून जिल्ह्याबाहेर प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे व जन्माला येणाऱ्या बालकाचा शोध घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com