कोकमला मिळाले "जीआय' मानांकन 

अमोल टेंबकर
मंगळवार, 21 मार्च 2017

सावंतवाडी - कोकणात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कोकमच्या सरसकट उत्पादनांना "जीआय' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाला प्रतिष्ठा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोकमच्या कृषी उत्पादनाला चांगले दिवस येणार आहेत. 

याबाबत येथील कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पाठक यांनी याला दुजोरा दिला आहे. या मानांकनासाठी असलेला प्रस्ताव मालवण येथील एका संस्थेने सादर केला होता, असे त्यांनी सांगितले. 

सावंतवाडी - कोकणात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कोकमच्या सरसकट उत्पादनांना "जीआय' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाला प्रतिष्ठा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोकमच्या कृषी उत्पादनाला चांगले दिवस येणार आहेत. 

याबाबत येथील कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पाठक यांनी याला दुजोरा दिला आहे. या मानांकनासाठी असलेला प्रस्ताव मालवण येथील एका संस्थेने सादर केला होता, असे त्यांनी सांगितले. 

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत कोकमची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. जंगलमय तसेच बागायती क्षेत्रात आढळून येणाऱ्या या झाडांपासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न अशी या झाडाची ओळख आहे. त्याचबरोबर कोकमपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तूंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात कोकम सरबत, सोले, बियांपासून तयार करण्यात येत असलेले तेल, औषधी गुणधर्मामुळे खूप महाग आहे. त्यामुळे कोकमच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. 

नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून कोकण रेल्वेमध्ये सुद्धा कोकम सरबताला प्रोत्साहन देण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोकमला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळावे, यासाठी मालवण येथील एका संस्थेच्यावतीने केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. "आत्मा' या योजनेंतर्गत जिल्हा कृषी विभागाकडून यासाठी आवश्‍यक असलेले सहकार्य करण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून "जीआय' मानांकनासाठी नेमण्यात आलेल्या विशेष समितीकडून "जीआय' मानांकन देण्यात आले आहे. 

याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पाठक म्हणाले, ""कोकमपासून कोकणाला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत आहे. त्याचा फायदा आता येथील काजू बागायतदारांना होणार आहे. या ठिकाणी आंबा, काजूच्या बागेत मोठ्या प्रमाणात कोकमची झाडे आहेत. आता "जीआय' मानांकन मिळाल्याने त्याचा मोठा फायदा बागायतदाराला होणार आहे. त्यांच्या शेतीमालास प्रतिष्ठा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमालाची नेमकी ओळख मिळणार आहे. त्याचबरोबर गुणवत्तेची खात्री असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कोकमपासून बनविण्यात आलेला कोणताही पदार्थ विकण्यास परवानगी मिळणार आहे. विशेष म्हणजे ही विक्री चढ्या दराने करण्यास मान्यता मिळणार आहे.'' 

"जीआय' मानांकन म्हणजे काय? 
भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता आणि इतर वैशिष्ट्याचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादनांना विविध पातळीवर दर्जा आणि किमतीत घट होऊ शकते; परंतु मानांकन मिळाल्यानंतर त्याचा दर्जा आणि विश्‍वासार्हता कायम राहते. त्यामुळे त्याचा फायदा संबंधित वस्तूला मिळू शकतो. 

कोकमच्या उत्पादनांना "जीआय' मानांकन मिळाल्याचा फायदा येथील बागायतदारांना होणार आहे. कोकणातील बागायतदारांची आर्थिक अवस्था या कोकमवर अवलंबून आहे. त्यामुळे यात आपसूकच आधुनिकता येऊन येथील रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. 
- सागर नाणोस्कर, उद्योजक, राज कोकम कंपनी, नाणोस