चेतना संगमच्या अंमलबजावणीत आधुनिक तंत्रज्ञान

चेतना संगमच्या अंमलबजावणीत आधुनिक तंत्रज्ञान

गुहागर - पारंपरिक हाफ पॅन्टला दूर करून पूर्ण विजारीचा अंगीकार करणाऱ्या संघाने तंत्रज्ञान वापरातही आधुनिकता आणली आहे. हिंदू चेतना संगममध्ये प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. स्वयंसेवकांच्या नोंदणीपासून कार्यक्रमाच्या संख्येपर्यंत प्रत्येक गोष्टीची नोंद मोबाईल ॲपवर झाली.

हिंदू चेतना संगमसाठी गणवेशातील स्वयंसेवकांबरोबरच प्रत्येक मंडलातून (१० ते १२ गावांचा समूह) उपस्थिती आली पाहिजे, असा आग्रह होता. नोंदणीसाठी जुलै २०१७ मध्ये एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले. त्यावर मंडलापासून प्रांतापर्यंत प्रत्येक नियुक्त कार्यकर्त्यांला स्वयंसेवक नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली होती. स्वयंसेवकाचे नाव, मोबाईल, ई-मेल, पत्ता आणि गणवेशाची नोंद होत होती. ऑगस्ट महिन्यापासून नोंदणी सुरू झाली. प्रत्येक स्वयंसेवकाला चेतना संगमची माहिती सांगून नोंदणी करण्यात आली. गणवेश पूर्ण झाला की अपडेशन केले जात होते. त्यामुळे प्रत्येक महिन्यात कार्यक्रम कितीजणांपर्यंत पोचला आणि गणवेशपूर्ती झालेल्या स्वयंसेवकांची मंडलात संख्या किती, याचा अंदाज येत होता. तालुका, जिल्हा, विभागस्तरावरील बैठकीतून नोंदणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेतला गेला. मोबाईल ॲपमुळे नेमके किती काम झाले हे स्वयंसेवकाला कळत होते. यामुळे कामाची ईर्षा आणि नोंदणीची गती वाढली.

मोबाईल ॲपद्वारे कार्यकर्त्यांना प्रांतातील नोंदणी कळवली जात होती. नवीन भागात कोणते पर्याय वापरू शकतो याची माहिती मिळत होती.

नोंदणी झालेल्या स्वयंसेवकांना कार्यक्रमाची आठवणही करून दिली जात होती. 

जिल्ह्यात १७ कार्यक्रमांत २५०१ गणवेशषारी
मुंबई महानगरापासून गोव्यापर्यंत पसरलेल्या कोकण प्रांतात २५५ ठिकाणी हिंदू चेतना संगमचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांत ३४४९८ गणवेषधारी स्वयंसेवकांसह ७३०८७ नागरिक उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात १७ कार्यक्रम झाले. त्यामध्ये गणवेषधारी स्वयंसेवकांची संख्या २५०१ तर नागरिकांची संख्या २९०५ होती.

डायलर ट्यूनमुळे वातावरणनिर्मिती
कार्यक्रमासाठी प्रांताने एक सांघिक गीत निश्‍चित केले होते. या गीताची चाल सर्वांना समजावी म्हणून ऑडिओ क्‍लिप व लिखित गीत व्हॉटस्‌ॲपद्वारे पाठविण्यात आले. या गीताची डायलर ट्यून बनवल्याने वातावरणनिर्मितीही झाली. ही ट्यून अनेक स्वयंसेवकांनी घेतली. सहज समन्वयाकरिता प्रत्येक तालुका, मंडलात हिंदू चेतना संगमचे व्हॉटस्‌ॲप ग्रुप तयार झाले. एखाद्याचा गणवेश पूर्ण झाल्यावर त्याचा फोटो ग्रुपवर टाकण्यात येत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com