डझनात मिळणारा हापूस आता शेकड्यात

सुनील पाटकर
बुधवार, 23 मे 2018

कोकणचा राजा हापूस आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी डझनच्या भावात मिळणारा हापूस आता शेकड्याच्या दरात मिळू लागल्याने आता हापूसची चव सर्वानांच चाखता येत आहे.

महाड - कोकणचा राजा हापूस आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी डझनच्या भावात मिळणारा हापूस आता शेकड्याच्या दरात मिळू लागल्याने आता हापूसची चव सर्वानांच चाखता येत आहे.कोकणच्या राजाची पहिली पेटी विकत घेण्यात अनेकांना भूषण वाटत असते. यावर्षी हापूसचे पिक समाधानकारक आल्याने पहिल्या टप्प्यात अनेकांना वाढत्या दरामुळे हापूस घेणे शक्य नव्हते. 

मुंबईत 1 हजार ते बाराशे रूपये डझन तर स्थानिक बाजारपेठेत 350 ते 400 रूपये डझन असे हापूसचे भाव होते. हळूहळू हे भाव 200 ते 250 रूपये डझनवर येऊन पोहचले. नंतर मे च्या पंधरवड्यात आंब्याचा दुसरा टप्पा बाजारात आला. यावेळी आंबा नैसर्गिक रित्या व झपाट्याने पिकत असल्याने स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. त्यामुळे डझनच्या दरात असलेला हापूस चक्क शेकड्याच्या दरात पोहचला. ग्रामिण भागात हे दर 900 ते 1 हजार व शहरी भागात 1 हजार ते बाराशे रूपये शेकडा या दरात हापूस मिळू लागल्याने घरोघरी गृहीणींकडून आमरसपूरीचा बेत आखला जात आहे. महाडमध्ये तसेच जिल्ह्यात दापोली, दाभोळ, मंडणगड, म्हाप्रळ, बाणकोट या भागातून मोठया प्रमाणात आंब्यांची आवक झाली आहे. 

टेंपो व वाहने घेऊन आंबा विक्रेते विक्री करत आहेत. त्यामुळे आता अनेक ग्राहकांच्या हातात हापूस दिसू लागला आहे. कोकणात पर्यटनाला येणारे पर्यटक जाताना आंबे घेऊन जात आहेत. कोकणात रस्त्यावरही हापूस विक्री सुरू आहे. 

मे महिन्यात विक्रिला येणारा आंबा हा नैसर्गिक पिकलेला असल्याने त्याची चव चांगली असते. स्थानिक बाजारपेठांमध्ये आता आंबा विक्री जोरात सुरु आहे. त्यातच दरही कमी झाले आहेत असे आंबा विक्रेता रफिक रखांगे यांनी सांगितले तर 

आंब्याचे भाव जास्त असल्याने हापूस घेणे शक्य नव्हते, आता हापूसचे दर आवाक्यात आल्याने हापूस घेणे शक्य झाले आहे, असे माधवी डावरे या गृहिणीने सांगितले. 

Web Title: hapu mangoes price are decrease