महामार्गावरील तीन पुलांची सुरक्षा रामभरोसे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

देवरूख - राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यात येणाऱ्या दोन पुलांच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तीन पुलांबाबत चौपदरीकरणाचे धोरण अद्यापही निश्‍चित झालेले नाही. परिणामी तालुक्‍यातील सोनवी, सप्तलिंगी आणि बाव नदी या तीनही पुलांचे या पावसाळ्यात भवितव्य काय, अशी भयशंका प्रवाशांच्या मनात राहणार आहे. महामार्ग चौपदरीकरणाआधीच या पुलांच्या डागडुजीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यातील आरवली गडनदी पूल हा १९३९ ला, शास्त्री १९४०, सोनवी १९३७, सप्तलिंगी १९४०, तर बावनदी पुलाची उभारणी १९२५ ला करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या गॅमन इंडिया कंपनीने हे पूल उभारले. यातील आरवली वगळता उर्वरित ४ पुलांची एवढ्या वर्षानंतरही डागडुजी व रुंदीकरण करणे महामार्ग विभागाला जमलेले नाही. ब्रिटिश भारतातून जाऊन आज ७० वर्षे होऊन गेली. शिवाय ब्रिटिशांनी बांधलेल्या तंत्रानुसार या पुलांचे आयुर्मान ६० वर्षे एवढेच होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त वर्षे होऊनही याकडे लक्ष दिले जात नाही.

तालुक्‍यातील चौपदरीकरणात शास्त्रीपुलाला पर्यायी पूल उभा राहत आहे. याचे ७० टक्‍के काम पूर्ण झाले आहे; मात्र संगमेश्‍वरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सोनवी पुलाबाबतचे स्पष्टीकरण अद्यापही करण्यात आलेले नाही. सप्तलिंगी पुलाशेजारी नव्या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. बावनदी पुलाजवळही नव्या पुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. सोनवी पुलाचे संरक्षक कठडे, रेलिंग तुटून गेले आहे. बावनदी पुलाचीही तीच अवस्थ आहे.

सप्तलिंगी पुलाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. आगामी पावसाळ्यात या तीन पुलांचे भवितव्य धोकादायक बनले आहे. महामार्गावरील हे तीन पूल महत्त्वाचे आहेत. यातील एकाही पुलाला धोका पोचल्यास महामार्गावरची वाहतूक बंद होऊ शकते अशी स्थिती आहे. महामार्ग विभागाने या पुलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. 

सोनवी पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. पुलावरून अवजड वाहन गेल्यास भूकंपासारखे धक्‍के आजूबाजूला जाणवतात. या पुलाचे भवितव्य धोकादायक असून बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे.
- संजय कदम, उपसरपंच, नावडी

Web Title: highway three bridge unsecure