रस्त्यावर बिघडलेली एसटी बस दुरुस्त न झाल्यास होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

महामंडळाचा निर्णय - अभियंता, आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी 

कणकवली - आगारातून गावात किंवा दुसऱ्या आागारात मार्गस्थ असेलल्या एसटीमधील बिघाड वेळेत दुरुस्त झाला नाही, तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रअभियंता, आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाने एका परिपत्रकातून दिला आहे.

महामंडळाचा निर्णय - अभियंता, आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी 

कणकवली - आगारातून गावात किंवा दुसऱ्या आागारात मार्गस्थ असेलल्या एसटीमधील बिघाड वेळेत दुरुस्त झाला नाही, तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रअभियंता, आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाने एका परिपत्रकातून दिला आहे.

सुरक्षित प्रवासासाठी राज्यातील प्रवासी एसटीने प्रवास करण्यावर भर देतात, परंतु अनेकदा रस्त्यातच एसटीमध्ये काही बिघाड होतो आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशातच एसटीचे कर्मचारी बिघडलेल्या एसटीची दुरुस्ती करण्यासाठी वेळेत येत नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे आता रात्री १२ वाजल्यानंतर महामार्गाच्या नजीकच्या आगारांमध्ये रात्री १२ ते सकाळी ९ वाजेपर्यंत किमान एक वाहन चालवण्याचा परवाना असलेला यांत्रिक कर्मचारी राखून ठेवण्याच्या सूचना एसटी महामंडळ प्रशासनाने दिल्या आहेत. 

ज्या रस्त्यावर एसटी बस वाटेतच नादुरुस्त होते. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो, वेळेचा अपव्यय होतो, तसेच महत्त्वाचे म्हणजे एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. बिघाड झालेल्या वाहनांऐवजी पर्यायी वाहन द्यावे लागते, वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर होतो, या सर्वांमध्ये महामंडळाचा खर्च वाढतो. त्यातच एसटीमध्ये बिघाड झाल्यास आपल्या हद्दीत येत नसल्याचे कारण पुढे करत बिघाड दुरुस्त करण्यास टाळाटाळ करतात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशा अनेक तक्रारी परिवहन विभाग आणि मंत्र्याकडे केल्या आहेत. यामुळे महामंडळाने एक परिपत्रक काढून सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत. एसटीमध्ये बिघाड झाल्यास ज्या डेपोला त्याची माहिती मिळेल, त्या डेपोने कोणत्याही परिस्थितीत बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी हद्दीचा वाद घालू नये, असे स्पष्टपणे परिपत्रकात म्हटले आहे. 
 

वाहन परवाना असलेला कर्मचारी ठेवणार 
अनेक आगारांमध्ये आगार कार्यशाळेचे कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालते. रात्री १२ नंतर आगार कार्यशाळेत यांत्रिक कर्मचारी नसतात. यामुळे वाहनाची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी महामार्गानजीकच्या सर्व आगारांमध्ये रात्री १२ ते सकाळी ९ वाजेपर्यंत किमान एक वाहन चालवण्याचा परवाना असलेला यांत्रिक कर्मचारी उपलब्ध राहील आणि हद्दीतील बिघडलेले वाहन लवकर दुरुस्त होईल, याची दक्षता घेण्यात यावी. लांब पल्ल्याच्या, निमआराम, प्रासंगिक करार आणि प्रतिष्ठित सेवेकरिता दिलेल्या एसटीची विशेष देखभाल करण्यात यावी, रिलीफ वाहन त्वरित देण्यात यावे, टायर पंक्‍चरचे काम लवकरात लवकर करून द्यावेत, अशा महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.