कोळी रोगाने बागायतींवर संकट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कडावल - कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील नारळ बागायतींवर ‘ईरिओ फाईड माईट’ रोगाचा अनिष्ट परिणाम होत आहे. या कोळीवर्गीय रोगामुळे उत्पादनात घट होत असून नारळांचा दर्जाही निकृष्ट होत आहे. या रोगाच्या प्रभावाखाली परिसरातील सुमारे ७० टक्के बागायती आल्या असून सतत होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

ईरिओ फाईड माईट हा कोळीवर्गीय रोग आहे. याच्या रोगजंतूचा प्रसार हवेतून हेतो. हवेतून रोगजंतू नारळाच्या पोईत शिरतात. तेथे त्यांची झपाट्याने वाढ होते. फळांच्या वाढीची प्रक्रिया सुरू असताना रोगजंतू फळांच्या सालीतील रसाचे नियमित शोषण करतात. त्यामुळे फळांची वाढ खुंटते व त्यांचा आकार अतिशय लहान होतो. परिणामी उत्पन्नात मोठया प्रमाणात घट निर्माण होते. 

रोगामुळे नारळ उत्पादनात घट येत असल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत. शिवाय रोगग्रस्त फळांची साल अतिशय पातळ व आतील नारळाला घट्ट चिकटलेल्या अवस्थेत असल्यामुळे असे नारळ सोलणे शेतकऱ्यांसाठी कष्टप्रद होत आहे. शेतकऱ्यांनी फळझाड लागवड योजनेतून मोठया प्रमाणात नारळ लागवड केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी स्वखर्चानेही माड बागायती उभ्या केल्या आहेत. यासाठी पदरमोड करून अविरत कष्टही उपसले आहेत आणि उत्पादनास सुरवात होत असतानाच बागायतींवर ईरिओ फाईड माईटने आक्रमण केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.