राणेंचा भाजप प्रवेश मुलांच्या भवितव्यासाठी - वैभव नाईक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कणकवली - नवरात्रोत्सवात होणारा नारायण राणेंचा भाजप प्रवेश हा निव्वळ त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सतीश सावंत, रणजित देसाई आदी कार्यकर्ते आमदार व्हावेत, असा विचार राणेंनी कधीच केलेला नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.

कणकवली - नवरात्रोत्सवात होणारा नारायण राणेंचा भाजप प्रवेश हा निव्वळ त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सतीश सावंत, रणजित देसाई आदी कार्यकर्ते आमदार व्हावेत, असा विचार राणेंनी कधीच केलेला नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.

येथील संपर्क कार्यालयात श्री. नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते. श्री. नाईक म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या, काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांकडून मते मिळवायची, पदांचा लाभ उठवायचा आणि काँग्रेसच्या बैठकीलाच विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घेत आहेत.

सद्यःस्थितीत काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री राणे हे आपले दोन सुपुत्र आणि समर्थक कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण भाजप नेत्यांनी त्यांना गेली अनेक महिने भाजप प्रवेशापासून लटकत ठेवले आहे. राणेंवर ही वेळ त्यांच्या दोन मुलांनी आणली आहे. राणेंचा भाजप प्रवेश हा केवळ त्यांच्या दोन मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी आहे. समर्थक कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. जवळचे कार्यकर्ते आमदार व्हावेत, असेही त्यांना कधी वाटत नाही.’’

पालकमंत्री श्री. केसरकर हे देखील भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना आमदार श्री. नाईक म्हणाले, ‘‘ज्यांना ‘ईडी’च्या चौकशीची भीती आहे, तेच भाजपमध्ये जात आहेत. आम्हाला तसेच आमच्या नेत्यांना ‘ईडी’च्या चौकशीची कधीच भीती नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. श्री. केसरकर यांनी पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर टीका आणि भाजप प्रवेशाच्या अफवा पसरविल्या जात आहेत.’’

जिल्ह्यात सद्यःस्थितीत भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. दोघांनाही मतदारांनी नाकारले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भाजप आणि काँग्रेसला जनता जागा दाखवून देणार आहे. शिवसेना या निवडणुका एकतर्फी जिंकेल, असा विश्‍वासदेखील श्री. नाईक यांनी व्यक्‍त केला.

दरम्यान, जिथे गाव पॅनेल असेल तेथील सरपंच उमेदवारास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असेही श्री. नाईक म्हणाले.

नीतेश राणेंना अंगरक्षकांचा ताफा कशासाठी हवा ?
अनेक गडकिल्ले आणि शिवछत्रपतींचा इतिहास सर्वसामान्य जनतेसमोर आणणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नीतेश राणे टीका करीत आहेत. त्यांना संरक्षण कशासाठी, असा प्रश्‍न विचारत आहेत. पण मुळातच नीतेश राणे हे एकटे कधी फिरणार? आपल्या सोबत काळ्या कपड्यातील अंगरक्षकांना ताफा घेऊन ते कशासाठी मिरवत आहेत? असाही प्रश्‍न आमदार श्री. नाईक यांनी उपस्थित केला.

मराठा कार्डचा स्वार्थासाठी वापर
मराठा समाजाने आमदार नीतेश राणे यांच्याकडे नेतृत्व सोपविले. राज्यात, जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात मराठा मोर्चा निघाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती; परंतु राणे हे मराठा कार्डाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करीत आहेत, अशी टीका श्री. नाईक यांनी केली.