कणकवलीतील 28 शाळा बंद होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

विद्यार्थ्यांची सोय लगतच्या शाळेत : 50 शिक्षक अतिरिक्‍त ठरणार

विद्यार्थ्यांची सोय लगतच्या शाळेत : 50 शिक्षक अतिरिक्‍त ठरणार
कणकवली - कणकवली तालुक्‍यातील पाचपर्यंत विद्यार्थी असलेल्या 28 शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. ज्या शाळा बंद होणार आहेत, त्या शाळांतील विद्यार्थ्यांची सोय लगतच्या केंद्र शाळेत केली जाणार आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली, तर तालुक्‍यात 50 शिक्षक अतिरिक्‍त ठरणार आहेत. याखेरीज चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दोन ते चार किलोमीटरची पायपीट करून दुसरी शाळा गाठावी लागणार आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून त्या शाळांतील विद्यार्थ्यांना लगतच्या केंद्र शाळेत पाठविण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे.

कणकवली तालुक्‍यात भिरवंडे गावातील परतकामवाडी, जांभूळगाव आणि खलांतर या तीन शाळा बंद होऊन त्यातील विद्यार्थी भिरवडे शाळा क्र.1 येथे वर्ग होणार आहेत. पिसेकामते-फळसे शाळेतील विद्यार्थी पिसेकामते-कदमवाडी शाळेत वर्ग होतील. हरकुळ बुद्रुक कोटेश्‍वर शाळेतील विद्यार्थी हरकुळ बुद्रुक शेखवाडीमध्ये, करंजे नारकरवाडीतील विद्यार्थी करंजे शाळा नं.1 मध्ये, जानवली सखलवाडीतील विद्यार्थी जानवली वाकाडवाडीमध्ये, साकेडी वरचीवाडीतील विद्यार्थी साकेडी नं.1 मध्ये, कळसुली गवसेवाडीतील विद्यार्थी कळसुली नं.1 मध्ये, शिरवल शाळा नं.2, तांबेवाडी शाळा नं.3 आणि रतांबेवाडी शाळा नं.5 मधील विद्यार्थी शिरवल शाळा नं.1 मध्ये वर्ग होणार आहेत. कासार्डे जांभूळवाडीतील विद्यार्थी कासार्डे ब्राह्मणवाडीमध्ये, कोळोशी वरचवाडीतील विद्यार्थी कोळोशी-हडपीड या प्रशालेमध्ये, नरडवे-पिंपळवाडी आणि भेर्देवाडीतील विद्यार्थी नरडवे शाळा नं.1 मध्ये, दारिस्ते शाळा नं.2 चे विद्यार्थी दारिस्ते शाळा नं.1 मध्ये, नाटळ कावलेटेंबमधील विद्यार्थी नाटळ खांदारवाडी येथे, नाटळ धाकटे मोहूळ येथील विद्यार्थी नाटळ आड्याचे टेंब येथे, वाघेरी नं.2 मधील विद्यार्थी वाघेरी नं.1 मध्ये, मठखुर्द गावातील विद्यार्थी तोंडवली शाळा नं.1 मध्ये, दारूम गावडेवाडीतील विद्यार्थी दारूम शाळा नं.1 मध्ये, वारगाव शाळा 2 मधील विद्यार्थी वारगाव शाळा नं.1 मध्ये, माईण उभाडे मधील विद्यार्थी माईण शाळा नं.1 मध्ये, सावडाव खांदारवाडीतील विद्यार्थी तरंदळे शाळा नं.1 मध्ये, सावडाव डगरेवाडी शाळेतील विद्यार्थी सावडाव शाळा नं.1 मध्ये, चिंचवली शाळा क्र.1 मधील विद्यार्थी चिंचवली मधीलवाडी या शाळेमध्ये, तर बेर्ले या शाळेतील विद्यार्थी शेर्पे शाळेमध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत.

शिक्षक अन्य तालुक्‍यात....
पहिली ते चौथीपर्यंत पाच पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये दोन शिक्षक नियुक्‍त केले आहेत. तालुक्‍यातील 28 शाळा बंद होणार असल्याने या प्रशालेमधील पन्नास शिक्षकदेखील अतिरिक्‍त ठरणार आहेत. या शिक्षकांना अन्य तालुक्‍यांतील जेथे रिक्‍तपदे आहेत, तेथे जावे लागण्याची शक्‍यता आहे.