दोघा बोगस डॉक्‍टरांवर कणकवलीत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

कणकवली - बोगस सर्टिफिकेट रुग्णालयात ठेवून रुग्णसेवा करणाऱ्या दोघांवर आज येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सुरेश गणपती शिंदे (धन्वंतरी क्‍लिनिक हुरमट तिठा) आणि गोपाळ गुरुप्रसाद राय (मुळव्याध दवाखाना, तेलीआळी-कणकवली) असे दोघा डॉक्‍टरांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जिल्ह्यात अवैधरीत्या रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्‍टर आणि रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. यात येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांनी तालुक्‍यातील रुग्णालयांची तसेच वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉक्‍टरांची चौकशी 4 आणि 5 एप्रिल 2017 ला केली होती. या चौकशीमध्ये हुमरट तिठा येथील धन्वंतरी क्‍लिनिक चालविणारे सुरेश गणपती शिंदे आणि तेलीआळी येथील मुळव्याध दवाखाना चालविणारे गोपाळ गुरुप्रसाद राय यांच्याकडील वैद्यकीय पदवी बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. तसा अहवाल डॉ. जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविला होता. त्यानंतर आज डॉ. जाधव यांनी या दोन्ही डॉक्‍टरांविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.