रेल्वे वेळापत्रक विस्कळीतच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कणकवली - मुंबापुरीतील अतिवृष्टीचा फटका मुंबई प्रमाणे कोकण रेल्वेलाही बसला. आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होते. अनेक गाड्या पाच ते दहा तास उशिराने धावत होत्या. यामुळे अनेक चाकरमान्यांना रेल्वे स्थानकावरच तासन्‌तास ठाण मांडावे लागले. कोकण रेल्वेचे वेळापत्रक उद्या (ता. १) पर्यंत सुरळीत होईल, असा विश्‍वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

मुंबईतील अतिवृष्टीमुळे कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या पनवेल ते सीएसटी या स्थानकादरम्यान अडकल्या. मुंबई उपनगरीय वाहतूक काहीशी सुरळीत झाल्यानंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एक्‍स्प्रेस गाड्यांचा मार्ग खुला केला. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक दुसऱ्या दिवशीही कोलमडले होते. 

आज (ता. ३१) मुंबईला जाणाऱ्या सावंतवाडी करमळी (०१४४८) आणि एलटीटी-करमळी (२२११५) या दोन गाड्या रद्द झाल्याची उद्‌घोषणा स्थानकावरून केली जात होती. दरम्यान, आज कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यापैकी सीएसटी-करमळी ही पास तास उशीराने धावत होती. तर सावंतवाडी-सीएसटी ही गाडी आठ तास, डाऊन दादर-सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस चार तास तर अप सावंतवाडी-दादर ही गाडी तब्बल बारा तास आणि मंगलोर-सीएसटीएम मुंबई एक्‍स्प्रेस ही गाडी २१ तास विलंबाने धावत होती. सीएसटी-मंगलोर ही गाडी चार तास तर पुणे एर्नाकुलम ही गाडी ९ तास ४६ मिनिटे उशिराने धावत होती. कोकण रेल्वे मार्गावर अन्य धावणाऱ्या गाडयामध्ये मांडवी अप आणि डाऊन, दिवा पॅसेंजर अप आणि डाऊन या गाड्या दोन तास विलंबाने धावत होत्या. 

मुंबईहून निघालेल्या आणि मुंबईला जाणाऱ्या प्रमुख गाड्या पाच ते दहा तास विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांना स्थानकावरच ताटकळत राहावे लागले होते. शहरातील प्रवाशांनी स्थानकात गाडी येईपर्यंत घरातच राहणे पसंत केले. शहराबाहेरील प्रवाशांनी मात्र रेल्वे स्थानकातच मुक्‍काम करावा लागला होता. कोकण रेल्वेचे वेळापत्रक उद्यापर्यंत (ता.१) सुरळीत होईल, अशी शक्‍यता रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावण्यासाठी अजून तीन ते चार दिवसांचा कालावधी जाणार आहे.