दुसरा मृतदेह बाहेर काढला

दुसरा मृतदेह बाहेर काढला

आंबोली - येथील कावळेसाद दरीत पडलेल्या इम्रान गारदी (वय २६, रा. भडगाव, गडहिंग्लज) याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आज सहाव्या दिवशी यश आले. बाबल अल्मेडा टीम आणि लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र रेस्क्‍यू टीमच्या युवकांनी आज दुपारी ही मोहीम यशस्वी केली. सहा दिवस वाट पाहणाऱ्या नातवाईकांच्या ताब्यात इम्रानचा मृतदेह देण्यात आला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सायंकाळी आंबोली येथे जात इम्रानच्या नातेवाईकांची भेट घेतली.

गडहिंग्लज येथेल पोल्ट्रीमध्ये काम करणारे प्रताप उजगरे (वय २१) (रा. बीड, सध्या रा. गडहिंग्लज) व इम्रान हे दोघे दारूच्या नशेत आंबोली-कावळेसाद येथील खोल दरीत पडले होते. हा प्रकार सोमवारी (ता. ३१) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून हिल राइडर्स अँड हायकर्स, समिट अॅडव्हेंचर्स कोल्हापूर आणि सांगेली येथील बाबल अल्मेडा टीमच्या वतीने दरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. शुक्रवारी (ता. ४) दुपारी बाबल अल्मेडा टीमच्या युवकांनी प्रतापचा मृतदेह दरीतून वर काढला. या टीममध्ये किरण नार्वेकर, अभय किनळोस्कर, पंढरीनाथ राऊळ, फिलीप अल्मेडा, संतान अल्मेडा, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, सुमन राऊळ, बाबूराव कविटकर, अबीर आंचेकर,  कृष्णा राऊळ यांच्यासह आंबोली येथील शंकर गावडे, अमरेश गावडे, दीपक मेस्त्री हे युवक सहभागी झाले होते.

दरम्यान, इम्रानचा मृतदेह वाहून गेल्याने त्याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे इम्रानचा मृतदेह मिळेल, की नाही याबाबत त्यांच्या नातेवाईकांना काळजी लागली होती. काल लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्‍यू टीमचे सुनील गायकवाड, आनंद गावडे, अजय राऊत, राजेंद्र कडू, प्रवीण देशमुख आदी युवक दाखल झाले. त्यांना तहसीलदार सतीश कदम यांनी अटकाव केला. यानंतर बाबल अल्मेडा टीम आणि शिवदुर्ग टीम यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानुसार आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. पुण्यातून येणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आलेच नाही. सकाळी नऊ वाजता लोणावळा टीमचे गणेश आणि प्रवीण हे दोघे दरीच्या संरक्षक कठड्याला दोरी बांधून दरीत उतरले. त्यांना बाबल अल्मेडा टीमने वरून सहकार्य केले. प्रतापचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता, त्याच्या दहा फूट अंतरावरच इम्रानचा मृतदेह अडकला होता. गणेश आणि प्रवीणने तो मृतदेह दोरीने बांधला. दुपारी दोन वाजता मृतदेह दरीबाहेर काढण्यात आला.

यानंतर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या ठिकाण पाकलमंत्री दीपक केसरकर यांनी नातवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कावळेसाद पॉईंटवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

शोधमोहिमेत सहायक पोलिस निरीक्षक अरुण जाधव, हवालदार गजानन देसाई, विश्‍वास सावंत, गुरुदास तेली, प्रकाश कदम, दत्ता कोलगोंडा हे पोलिस वगळता अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेने सहकार्य केले नसल्याने बाबल अल्मेडा टीमने तीव्र नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com