जिल्ह्यात अंडी उबवणी केंद्राची गरज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

कडावल - जिल्ह्यात अंडी उबवणी केंद्र नसल्यामुळे येथील शेकडो व्यावसायिकांना परजिल्ह्यातून कोंबडीची पिल्ले आणावी लागत आहेत. व्यावसायिकांची गैरसोय दूर होण्यासाठी जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी अंडी उबवणी केंद्र होणे गरजेचे आहे.

दरम्यान, निळेली येथील नियोजित मदरस्टॉकसहीत अंडी उबवणी केंद्राचे काम लवकर पूर्ण झाल्यास येथील कोंबडी पालन व्यावसायिकांना दिसासा मिळणार आहे. यामुळे येथील व्यावसासिक या केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्याच्या विविध भागांत शेकडो कोंडीपालन व्यावसायिक कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक, परसातील कोंबडी पालनाबरोबरच येथे व्यावसायिक दृष्टिकोनातूनही मोठ्या प्रमाणात कोंबडीपालन होत आहे. यासाठी येथील तरूणांनी बॅंका तसेच इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन शेड व इतर यंत्रणा उभारली आहे; मात्र जिल्ह्यात मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र नसल्यामुळे येथील व्यावसायिकांना कोंबडीची पिल्ले परजिल्ह्यातून आणावी लागतात. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येथील व्यावसायिकांची होणारी गैरसोय ओळखून जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी कोकण विकास पॅकेजमधून २००९ मध्ये अंडी उबवणी केंद्राची घोषणा केली होती; मात्र नंतर प्रशासकीय पातळीवरून अपेक्षित पाठपुरावा न झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत प्रभारी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण यांनी पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले यांचे या प्रलंबित प्रस्तावाकडे लक्ष वेधले असता त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे अंडी उबवणी केंद्राबाबत आशा पुन्हा पल्लवीत झाल्या.

कुडाळ तालुक्‍यातील निळेली पशुपैदास केंद्रातील जागा या प्रकल्पासाठी निश्‍चित केली असून पशुआयुक्तालय संचालकानी अलीकडेच नियोजित जागेची पाहणी करून विद्यापीठाकडून सदर जागा पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात निळेली येथे १० हजार पक्षांची क्षमता असलेले अंडी उबवणी केंद्र साकारणार आहे. याच केंद्रालगत मदर स्टॉक केंद्रही उभारण्यात येणार आहे. या केंद्रात नवजात पिल्लांचे संगोपन करून त्यांचा व्यावसायिकांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येणार आहे.

आर्थिक फटका
सद्य:स्थितीत अंडी उबवणी केंद्राची सुविधा नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कोंबडीपालन व्यावसायिकांना परजिल्ह्यातून कोंबडीची पिल्ले आणावी लागत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नजीकच्या काळात निळेली येथे मदर स्टॉकसह अंडी उबवणी केंद्राच्या निर्मितीमुळे संबंधित व्यावसायिकांची गैरसोय दूर होणार असल्याने ते या केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.