मुंबईला जाणाऱ्या गाड्या पाच तास विलंबाने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मंडणगड - गणेशोत्सवासाठी गावी आलेले मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मंडणगड स्थानकातून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांची वेळ साधताना ग्रामीण भागातून येणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तुळशी, पाले, आंबवणे, पाचरळ येथील प्रवाशांना सकाळच्या वेळेस एसटी न थांबल्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. सलग तिसऱ्या दिवशीही स्थानकात चाकरमान्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

परतीच्या प्रवासासाठी आगार व्यवस्थापनाने मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, विरार या मार्गावर दररोज तीस जादा गाड्या स्थानकातून सोडल्या आहेत. मात्र गाड्यांचे आरक्षण केलेल्या तालुक्‍यातील ग्रामीण भागातील मुंबईकरांची मंडणगड बस स्थानक गाठताना दमछाक होत आहे. 

स्थानिक पातळीवर धावणाऱ्या गाड्या सुरवातीच्या ठिकाणापासून भरून येत असल्याने अनेक ठिकाणी गावातील थांब्यावर या गाड्या थांबल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण केलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्यांना रिक्षा, ट्रॅक्‍स व वडापचा आधार घ्यावा लागला. नियमित सुटणाऱ्या मुंबईतून येणाऱ्या गाड्या वाहतूक कोंडीमुळे व रस्त्यावरील प्रचंड वाहतुकीमुळे तीन ते चार तास उशिराने येत आहेत. परिणामी मुंबईला जाण्यासाठी पुन्हा याच गाड्या वापरताना त्या उशिराच सुटतात. यामुळे सारे वेळापत्रक कोलमडले आहे. परतीसाठी चाकरमान्यांना सलगत तिसऱ्या दिवशी विलंब होत आहे. प्रवासी वाट पाहून वैतागले आहेत. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सुदैवाने वरुणराजाने मात्र कृपा केली आहे.

मंडणगड स्थानकातून सकाळी दहा वाजता सुटणाऱ्या वेळास-मुंबई गाडीचे संपूर्ण कुटुंबाचे आरक्षण आहे. मात्र दुपारी एक वाजले तरीही गाडी आलेली नाही. नियमित जाणाऱ्या गाड्या उशिरा आणि जादा गाड्या वेळेवर अशी स्थिती आहे. गाडीची वाट पाहत तिष्ठत उभे राहिलो.
- प्रमोद वणे, प्रवासी