कोकणच्या विकासासाठी 1 लाख कोटींचे पॅकेज - नितीन गडकरी

अजय सावंत, अमोल टेंबकर
शनिवार, 24 जून 2017

कुडाळ - ""कोकणला पुढील तीन वर्षांत एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल'', अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 2018 पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. सर्वच नेत्यांनी कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. 

कुडाळ - ""कोकणला पुढील तीन वर्षांत एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल'', अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 2018 पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. सर्वच नेत्यांनी कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या शेवटच्या चार टप्प्यांतील कामाचे भूमिपूजन आज येथे झाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, रामदास कदम, दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, वैभव नाईक, राजन साळवे आदी उपस्थित होते. 

या वेळी गडकरी म्हणाले, ""मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रत्यक्षात येत आहे. ते पाहून आनंद झाला. यापूर्वी देशात पाच लाख अपघात होत होते. त्यातील दीड लाख लोकांचा मृत्यू होत होता. त्यामुळे देशातील महामार्ग रुंद करण्याचा निर्णय मी घेतला. यापूर्वी दिवसाला दोन किलोमीटर रस्त्याचे काम केले जात होते. मी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रतिदिन 23 किलोमीटर रस्ता, अशी गती घेतली. मात्र, आता 40 किलोमीटरपर्यंत दर दिवशी रस्त्याचे काम करण्याचा मानस आहे. आमचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत अपघातामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण 50 टक्केपर्यंत कमी करण्यासाठी आपला प्रयत्न असेल.'' 

श्री. गडकरी म्हणाले, ""यापूर्वीच्या सरकारकडून पनवेल ते इंदापूर महामार्गाचे काम हाती घेण्यात आले; मात्र दुर्दैवाने ते काम पूर्ण झाले नाही. अर्धवट राहिले; परंतु मी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते काम पूर्ण कसे होईल, यासाठी प्रयत्न केला. 2018 पर्यंत संपूर्ण महामार्ग चौपदरीकरण करण्याचा आपला मानस आहे; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली जागा संपादित करून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री व येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. हा महामार्ग केवळ गोव्यापर्यंत नाही तर कर्नाटकपर्यंत चौपदरीकरण केला जाणार आहे. त्यासाठी 18 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबईसह कर्नाटकातील आणि गोव्यात येणारे पर्यटकसुद्धा कोकणात यावेत, हा यामागचा उद्देश आहे. ग्रीन एन्व्हायर्न्मेंट म्हणून कोकणाला जगात ताकद निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे.'' 

श्री. गडकरी म्हणाले, ""विकास आणि पर्यटनाचा समतोल राखून कोकणातील बंदरांचा विकास करण्यात येणार आहेत. रस्ते जोडण्यात येणार आहेत. वीज, एलएनजी व इथेनॉलवर चालणाऱ्या बस सुरू करण्याचा मानस आहे. जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग व्हावा, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांनी अनेक वेळा तशी ती बोलून दाखविली होती. महाराष्ट्रात मंत्री असताना मला ते शक्‍य झाले नाही; मात्र आज त्यांची इच्छा पूर्ण केली. आता कोकणाला 40 लाख कोटींचे पॅकेज दिले. ते लवकरच 50 लाख कोटींवर जाईल. येत्या तीन वर्षांत 1 लाख कोटीची कामे कोकणात करण्यात येणार आहेत. त्यातून तब्बल अडीच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग, महामार्ग आणि जलमार्ग यातून कोकणचा विकास साधण्यात येणार आहे.'' 

श्री. फडणवीस म्हणाले, ""मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर मुंबई कोकणाच्या अत्यंत जवळ येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोकणाचा विकास होणार आहे. शिवसेना-भाजप सरकार कोकणच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील राहिले आहे. येथील पर्यावरण आणि निसर्गाची सांगड घालून कोकणचा विकास करण्याचा आमचा मानस आहे. गोव्यापेक्षा चांगले पर्यटन त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे भविष्यात चांगले दिवस कोकणाला येणार आहेत. पंचतारांकित हॉटेल आल्याशिवाय येथे विकास होणार नाही. त्यामुळे ताज हॉटेलला जमीन देण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला आहे.'' 

श्री. ठाकरे म्हणाले, ""आज येथे होणाऱ्या समारंभात मी वेगळ्या जाणिवेने आणि भावनेने आलो आहे. हा महामार्ग व्हावा, अशी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांचे कोकणावर प्रेम होते. अनेक मंत्री आले. कोकणचा कॅलिफोर्निया करू, अशी त्यांनी वारंवार घोषणा केली; परंतु त्यांना काही शक्‍य झाले नाही. हा महामार्ग कोकणवासीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कोकण हे मुंबईचे हृदय आहे. महामार्ग झाल्यावर हा भाग खऱ्या अर्थाने जोडला जाणार आहे. रस्ते, रेल्वे या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. छत्रपतींचे किल्ले याच भूमीत आहेत. या पायाभूत सुविधा झाल्यावर येथे पर्यटनही वाढेल. कोकणवासीयांसाठी हा विकास आहे. विकासानंतर येथे उपरे येऊन चालणार नाहीत.'' 

ते म्हणाले, ""हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबईसारखा मुंबई-कोकण सहज शक्‍य होणार आहे. गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच अनेक वर्षे रखडलेला महामार्ग आज मार्गी लागला. वेगाने काम करणारा मंत्री म्हणून गडकरी यांची ओळख आहे; परंतु भविष्यात कोकणाचा विकास करताना कोकणच्या लोकांना त्याचा फायदा होईल, यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आताच याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे. विकासाच्या मुद्द्यांसाठी जिल्ह्यातील सर्व नेते एकाच छताखाली आले ही चांगली गोष्ट आहे.'' 

माजी मुख्यमंत्री राणे म्हणाले, ""2012 पासून चौपदरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण होते याचा आनंद आहे. विकास आहे तिथे पक्षीय राजकारण आणू नये.'' 

रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, ""कोकणवासीयांना संकुचित म्हणून हिणवले जाते. प्रत्यक्षात त्यांचे मन विशाल आहे. कदाचित महामार्गाचा आकार संकुचित असल्यामुळे असा समज झाला असावा. तो आता दूर होईल. रेल्वेच्या माध्यमातून येथे खूप कामे हाती घेतली आहेत. भविष्यात रेल्वेने पश्‍चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. याच्या जोडीने देवगड बंदर जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गडकरी व मी एकत्र येऊन काम करत आहोत. भविष्यात येथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा होतील.'' 

श्री. गीते म्हणाले, ""मी व विनायक राऊत यांनी महामार्ग चौपदरीकरणाचा आग्रह गडकरी यांच्याकडे धरला. आता हा प्रकल्प मार्गी लागत आहे. याच्यासाठी निधीची अडचण येणार नाही.'' 

रामदास आठवले म्हणाले, ""येथील वातावरण, येथील निसर्ग चांगला आहे. येथील माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. चौपदरीकरणाला पैसा कमी पडणार नाही. सिंधुदुर्ग खुलवण्याचे काम आम्ही करू.'' 

या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर संदेश पारकर, राजन तेली, प्रमोद जठार, बाळ माने, अतुल काळसेकर, काका कुडाळकर, शिवराम दळवी, चारुदत्त देसाई, अजित गोगटे, नागेंद्र परब, सुभाष मयेकर, अरुण दुधवडकर, शैलेश परब, सुरेश पाटील, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, नगराध्यक्ष विनायक राणे, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर आदी होते. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. 

पावसाने दिला आशीर्वाद 
कार्यक्रमाला शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळीच सुरू झालेल्या या पावसाचा उल्लेख त्यांनी "आशीर्वाद मिळतोय' असा केला. 

दृष्टिक्षेपात 

* कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी 
* पोलिसांकडून चोख नियोजन 
* कॉंग्रेस, शिवसेनेसह राणे समर्थकांकडून घोषणाबाजी 
* रामदास आठवलेंचे कवितायुक्त भाषण लक्षवेधी 
* पूर्ण महामार्गावर शिवसेना-भाजपचे झेंडे 
* कार्यक्रम उशिरा सुरू होऊनही गर्दी टिकून 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर मुंबई कोकणाच्या अत्यंत जवळ येणार आहे. येथील पर्यावरण आणि निसर्गाची सांगड घालून कोकणचा विकास करण्याचा आमचा मानस आहे. 
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

हा महामार्ग व्हावा, अशी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांचे कोकणावर प्रेम होते. महामार्ग झाल्यानंतर कोकण खऱ्या अर्थाने मुंबईला जोडला जाणार आहे. विकासानंतर येथे उपरे येऊन चालणार नाहीत. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

2012 पासून या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण होते, याचा आनंद आहे. विकास आहे तेथे पक्षीय राजकारण आणू नये. 
- नारायण राणे, माजी मुख्यमंत्री