सिंधुदुर्गचा पायलट मीच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

कुडाळ - मी काँग्रेस पक्षाचा नेता आहे. काँग्रेसमध्ये मी समाधानी आहे. कोणी कुठे जावे याचा सल्ला प्रमोद जठारांनी देऊ नये. आधी आपली पात्रता समजून भाष्य करावे. सिंधुदुर्गचा पायलट मीच आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार नारायण राणे यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केले.

कुडाळ - मी काँग्रेस पक्षाचा नेता आहे. काँग्रेसमध्ये मी समाधानी आहे. कोणी कुठे जावे याचा सल्ला प्रमोद जठारांनी देऊ नये. आधी आपली पात्रता समजून भाष्य करावे. सिंधुदुर्गचा पायलट मीच आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार नारायण राणे यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केले.

आमदार नीतेश राणे यांनी मालवणात पारंपरिक मच्छीमारांसाठी केलेल्या आक्रमक आंदोलनाचे त्यांनी समर्थनच केले. ते म्हणाले, ‘‘मी काँग्रेसचा आहे. भाजपच्या जठारांनी स्वतःची पात्रता समजून भाष्य करावे. महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन हा शासकीय कार्यक्रम होता. यातही भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची स्पर्धा दिसत होती. २०१४ मध्ये आमच्या सत्ता काळातच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चौपदरीकरणाची महत्त्वाची प्रक्रिया पार पडली. फक्त भूसंपादन प्रक्रिया आताच्या सरकारने केली आहे. त्यामुळे याचे श्रेय आमचेच आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी काहीही केलेले नाही. इथल्या शिक्षण क्षेत्रासाठी आम्हीच सर्वकाही केले. त्यांनी वाटल्यास ते तपासून पाहावे. विधिमंडळात स्वत:चे हसे करून घेणारे ते पहिलेच पालकमंत्री आहेत. दहावीतील यशाचे श्रेय ते स्वतः घेत आहेत. चौपदरीकरणाचे श्रेयही पालकमंत्र्यांनी घेणे ही त्यांची विकृती म्हणावी लागेल. त्यांनी आधी बालवाडी बांधावी, नंतर इंजिनिअरिंग कॉलेजचे स्वप्न पाहावे.’’

ते म्हणाले, ‘‘मी सर्वांगीण विकासात्मक कामे केली; पण त्याचे श्रेय कधीही घेतले नाही. मी सुरू केलेली कामे किमान पूर्ण तरी करा; पण तेही यांच्या हातून घडत नाही. सी-वर्ल्ड प्रकल्प तीन वर्षे रखडला आहे. विमानतळाचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. आता हे सर्व समदु:खी एकत्र येऊन मला सल्ले देत आहेत. त्यांनी सल्ले देण्यापेक्षा विकासकामे करावीत.’’

जीएसटीबाबत राणे म्हणाले, ‘‘जीएसटी वाढल्याने जिल्ह्यात किती प्रकल्प येणार, किती जणांना रोजगार मिळणार? जीएसटीमुळे जिल्ह्याची गरिबी दूर होणार असे म्हणणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी याबाबत आमनेसामने यावे. कर्जमाफीवरून अजूनही शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद सुरू आहे. शिवसेनेकडे सध्या ढोल वाजविण्यापलीकडे काहीच नाही.’’

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, विकास कुडाळकर, विकास सावंत आदी उपस्थित होते.

‘त्या’ आंदोलनाचे समर्थनच
‘बांगडा फेक’ आंदोलनाबाबत ते म्हणाले, ‘‘नीतेश राणेंची भूमिका योग्यच होती. मी त्याचे समर्थन करतो. मुजोर अधिकाऱ्यांना अशीच आक्रमक भाषा समजते. तेथे बांगडा मिळाला म्हणून तो मारला नाहीतर...! खरे तर त्यांनी बांगडा अधिकाऱ्याच्या तोंडावर मारला नाही तर टेबलावर आपटला. या विषयावर आमची चर्चा झाली नाही. झाली असती तर नेम का चुकला म्हणून विचारले असते. हे आंदोलन हप्तेखोरांना झोंबले. अनेक आंदोलक एकत्र आले तर आंदोलन कुठच्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. त्याचे मी समर्थन करतो. मारल्याचे नाही तर आंदोलनाचे.’’