उन्हेरे कुंडाला दुरवस्थेचे चटके

अमित गवळे 
बुधवार, 7 जून 2017

पाली - सुधागड तालुक्‍यातील उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड आणि त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. तर बाहेरील कुंडावर स्नान करणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. 

पाली - सुधागड तालुक्‍यातील उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड आणि त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. तर बाहेरील कुंडावर स्नान करणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. 

उन्हेरे येथील कुंडातील पाणी आंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ असल्याने त्याला अनेकांची पसंती आहे. परंतु या परिसरात चांगल्या सोई-सुविधा नाहीत. कुंडाजवळ रायगड जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह आहे. त्याच्या दरवाजे-खिडक्‍या मोडल्या आहेत. आतील स्वच्छतागृह आणि स्नानगृह खराब झाले आहे. भिंतीवर जळमटे आली आहेत. बाहेर वाळू व मातीचे ढीग पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. 

विश्रामगृहाशेजारीच निर्मल भारत अभियानांतर्गत दोन लाख रुपये खर्चून फेब्रुवारी २०१४ मध्ये चार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत; परंतु ती अस्वच्छ आहेत. त्यांचे काही दरवाजे तुटले आहेत. देखभाल नसल्याने या स्वच्छतागृहाचा वापर होत नाही. स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या कपडे बदलण्यासाठीच्या खोल्याही कोसळल्या आहेत. 

कुंड परिसरात असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरासमोरील सभामंडपाचे काम कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहे. 

कुंडाजवळच्या विश्रामगृहाची दुरुस्ती केली आहे. अनुदान नसल्याने काही कामे अपूर्ण आहेत. इतर कामांचे प्रस्ताव पाठविले आहेत. 
- राहुल चव्हाण, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

उन्हेरे कुंड सुधागड तालुक्‍याच्या पर्यटनविकासाला चालना देणारे आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोई-सुविधा नाहीत. या परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
- राजेश मपारा, अध्यक्ष, भाजप व्यापारी सेल

दृष्टिक्षेप 
पालीपासून अडीच ते तीन किलोमीटरवर उन्हेरे गरम पाण्याचे कुंड.
उन्हेर कुंडावर तीन कुंडे आहेत. 
एक कुंड थंड पाण्याचे; तर उर्वरित दोन कुंडे गरम पाण्याची आहेत. 
थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर आहे.
दुसरे कुंड बंदिस्त असून त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत. 
सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी या कुंडाभोवती फरशा बसवल्या होत्या.