आधी दर सांगा; मगच जमीन देऊ!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

रत्नागिरी, - जयगड-डिंगणी रेल्वे मार्गासाठी रिळमधील जमिनीला अपेक्षित दर दिला गेला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रकल्पाला विरोध नाही; मात्र जमिनीला चांगला दर ग्रामस्थांना हवा आहे.

रत्नागिरी, - जयगड-डिंगणी रेल्वे मार्गासाठी रिळमधील जमिनीला अपेक्षित दर दिला गेला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रकल्पाला विरोध नाही; मात्र जमिनीला चांगला दर ग्रामस्थांना हवा आहे.

जयगड-डिंगणी रेल्वे मार्ग रिळ गावातून जातो. भूमिअभिलेखने २०, २१ जूनला मोजणीची नोटीस दिली; मात्र जमीन कोण घेणार, त्याचा मोबदला किती, जमीनमालकांच्या वारसांना नोकरी, अशा मुद्द्यांची चर्चा झाली नव्हती. त्या मोजणीला विरोध केला. यावर २७ जूनला कोकण रेल्वेचे सहायक अभियंता श्री. पाटणकर व जिंदलचे अधिकारी आणि ग्रामस्थ अशी संयुक्‍त बैठक झाली. तेव्हा जमीन दराबाबत महसूलकडे बोट दाखवले. हा प्रकल्प पूर्णतः व्यावसायिक पद्धतीने केला जात आहे. रिळच्या शेजारील चाफेरीसह अन्य गावांमध्ये जमिनीचा दर लाखापर्यंत पोचला. तोच रिळमध्ये मिळावा, अशी मागणी आहे. यावर जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी पाटणकर, राजू लिमये, श्रीधर सावंत यांनी ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे बैठक घेतली तेव्हाही प्रांतांनी गुंठ्याचा दर किती हे सांगितले नाही. रेडिरेकनरच्या चौपट दर देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रांतांकडील बैठकीला बाबू पाटील, गणेश साठे, दिंगबर काणे, सिद्धार्थ बोरकर, प्रमोद दिवेकर, विश्‍वास चव्हाण, दिगंबर साठे यांच्यासह काही ग्रामस्थ उपस्थित होते.

आमचा प्रकल्पाला विरोध नाही; परंतु दर अपेक्षित मिळाला पाहिजे. नाहीतर आमच्या जमिनी कवडीमोलाने विकल्या जातील. प्रांतांकडील बैठकीतही अपेक्षित उत्तर मिळालेले नाही. न्यायासाठी आंदोलनही करावे लागेल. ग्रामसभेत यावर निर्णय घेतला जाईल.
- तुषार चव्हाण, ग्रामस्थ.