अंडरग्राऊंड वीजवाहिन्यांसाठी ११ कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सावंतवाडी - शहरातील महत्त्वाच्या भागातील वीजवाहिन्या अंडरग्राऊंड करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हे काम हातात घेण्यात येणार असून यासाठी ११ कोटीचा निधी मंजूर आहे, अशी माहिती महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कैलास लव्हेकर यांनी आज येथे दिली. 

दरम्यान पावसाळ्यात वीज ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वीज मंडळाकडून आवश्‍यक ती खबरदारी घेतली आहे. तरीही काही तक्रारी असल्यास दखल घेऊ, असे त्यांनी सांगितले. 

पावसाळ्याच्या तोंडावर शहरात विजेची समस्या जाणवू नये यासाठी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी उपकार्यकारी अभियंता अमोल राजे, कनिष्ठ अभियंता अतुल पाटील, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, भारती मोरे, शिवप्रसाद कुडपकर आदी उपस्थित होते. 

या वेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी शहरातील समस्या मांडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा कमी दाबाने होत आहे, खांब मोडक्‍या आणि गंजलेल्या स्थितीत आहेत, वाहिन्या लोबंकळत असल्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, झाडी वाढली आहे, गटारात खांब टाकले आहेत, अशा विविध सुचना यावेळी केल्या. तसेच येणाऱ्या पावसाळ्यात कोणत्याही समस्येला तोंड द्यावे, लागू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान श्री. लव्हेकर यांनी माहिती दिली ते म्हणाले, ‘‘येत्या दिड वर्षात शहरातील मुख्यवाहिन्या अंडरग्राऊंड करण्यात येणार आहेत. यामुळे धोक्‍याची शक्‍यता कमी आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील चितारआळी, उभाबाजार, सालईवाडा आणि तलावाकाठचा परिसर घेण्यात येणार आहे. यासाठी एकात्मिक विकास कार्यक्रमाअंतर्गत ११ कोटी मंजूर झाले आहे. त्याचा ठेका सुध्दा कोल्हापुर येथील एका कंपनीला दिला आहे. कमी दाबाने ज्या ठिकाणी विज पुरवठा होत आहे त्या ठिकाणचे सर्व्हेक्षण केले आहे. अशा पाच ठिकाणी नव्याने ट्रान्सफार्मर लावण्यात येणार आहे. नगराध्यक्षांनी दिलेल्या सुचनांनुसार धोकादायक खांब बदलण्यात येणार आहेत. त्याच बरोबर लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. तरीही काही तक्रारी असल्यास ग्राहकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा.’’

ग्राहकांकडून विजेची खरेदी
या वेळी श्री. लव्हेकर म्हणाले, ‘‘ग्राहकांकडे सोलर सिस्टीम बसवून त्यांच्याकडून उलट महावितरण वीज खरेदी करणार आहे. यासाठी संबंधित ग्राहकाला वेगळे मीटर देण्यात येणार आहे. यातून किती वीज त्यांनी कंपनीला दिली याचे रीडिंग असणार आहे. यातून संबंधित ग्राहक आपल्या घरासाठी किंवा कार्यालयासाठी सौर वीज वापरू शकतो. आणि उर्वरित वीज आम्ही खरेदी करणार आहोत.’’