मत्स परवान्याचे अधिकार बंदर अधिकाऱ्यांना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

किल्ला प्रवासी वाहतूक व्यावसायिकांच्या परवान्यांचा प्रश्‍न प्रलंबित होता, तो सोडविण्यात आला आहे. प्रलंबित परवाने देण्याचे आदेश बंदर अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे, नेव्हल आर्कीटेक्‍ट सुधीर श्रीवास्तव यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत याबाबतची कार्यवाही केली जाईल. नौका सर्वेक्षणाचे अधिकार स्थानिक बंदर अधिकाऱ्यांना देण्याची मागणी होती, त्यानुसार लवकर शिबिर घेऊन परवानग्या दिल्या जातील. आयबी नोंदणीही करण्याच्या सूचना बंदर अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
- रवींद्र चव्हाण, बंदर विकास राज्यमंत्री

मालवण : नौकाधारक, जलपर्यटन व्यावसायिकांना आवश्‍यक परवाने तत्काळ देण्याबरोबरच नौकांचे सर्वेक्षण करून परवानग्या देण्याचे अधिकार बंदर अधिकाऱ्यांना दिला जाईल. परवानग्या देण्यासाठी लवकरच शिबिर घेतले जाईल. किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा निर्माण होऊ नये, यासाठी बंदर जेटीवरील व्यावसायिकांसाठी दुकानगाळे काढून ते भाड्याने दिले जातील, असे राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले.
येथील पर्यटनाला यापुढे कोणतीही अडचण भासणार नाही, याचीही दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
 

दरम्यान, किल्ल्यानजीक गतवर्षी जी पर्यटकांसाठी जेटी बांधण्यात आली, ती सदोष असल्याने या जेटीच्या कामाच्या चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

मालवण दौऱ्यावर आलेल्या बंदर विकास राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सायंकाळी सरकार आपल्या दारी या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी बंदर जेटीस भेट देत सागरास श्रीफळ अर्पण केले. बंदर जेटीनजीकच्या जागेची त्यांनी पाहणी केली. लायन्स व लायनेस क्‍लबच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेस त्यांनी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
 

सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे मेरिटाइम बोर्ड, बंदर तसेच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. श्री. चव्हाण म्हणाले, ""प्रवासी वाहतुकीची क्षमता 20 पर्यंत करण्यात येईल. प्रवासी, पर्यटक यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, यासाठीची दक्षता घेतली जाईल. बंदर जेटीवरील व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना व्यवसायासाठी दुकानगाळे भाडेतत्वावर उपलब्ध करून दिले जातील, यासाठी आवश्‍यक आराखडा तयार करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. देवबाग येथील जेटीच्या कामाबरोबर रस्ताकम बंधारा बांधण्यासाठी जिओ ट्युबचा वापर करता येईल का? यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गतवर्षी किल्ल्यानजीक जी जेटी बांधली ती सदोष आहे. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्याने त्या जेटीच्या कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कर्ली खाडीतील गाळ काढण्यासाठी तीन ड्रेझरबरोबर लोकसहभाग आवश्‍यक आहे. त्यातून हे काम मार्गी लावले जाईल. काढलेला गाळ टाकण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आवश्‍यक जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. देवबाग ते भोगवे अशी फेरीबोटची सुविधा झाल्यास गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांना चांगली सुविधा निर्माण होईल. शिवाय वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, त्या दृष्टीने आवश्‍यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, बाबा मोंडकर, विलास हडकर, महेश मांजरेकर, संजय यादवराव, राजू राऊळ, गोपी पालव, आपा लुडबे, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, राजन वराडकर, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर, संदीप शिरोडकर यांच्यासह अन्य भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

किल्ला प्रवासी वाहतूक व्यावसायिकांच्या परवान्यांचा प्रश्‍न प्रलंबित होता, तो सोडविण्यात आला आहे. प्रलंबित परवाने देण्याचे आदेश बंदर अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे, नेव्हल आर्कीटेक्‍ट सुधीर श्रीवास्तव यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत याबाबतची कार्यवाही केली जाईल. नौका सर्वेक्षणाचे अधिकार स्थानिक बंदर अधिकाऱ्यांना देण्याची मागणी होती, त्यानुसार लवकर शिबिर घेऊन परवानग्या दिल्या जातील. आयबी नोंदणीही करण्याच्या सूचना बंदर अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
- रवींद्र चव्हाण, बंदर विकास राज्यमंत्री

Web Title: License rights for fish port officials