नुकसानीचे पंचनामे तात्काळ द्या - रेश्‍मा सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

बांदा - बांदा दशक्रोशीत अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्व पंचनामे दोन दिवसात आपल्याकडे पाठवा. तसेच यात कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत यांनी येथे आढावा बैठकीत दिला. तसेच बैठकीला गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाईचे आदेश सौ. सावंत यांनी दिले.

बांदा - बांदा दशक्रोशीत अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्व पंचनामे दोन दिवसात आपल्याकडे पाठवा. तसेच यात कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत यांनी येथे आढावा बैठकीत दिला. तसेच बैठकीला गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाईचे आदेश सौ. सावंत यांनी दिले.

बैठक येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ. निकिता सावंत, सरपंच बाळा आकेरकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शितल राऊळ, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, ग्रामपंचायत सदस्य अशोक सावंत, गटविकास अधिकारी मोहन भोई उपस्थित होते.

यावेळी सौ. सावंत यांनी १५ गावात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. परब यांनी गावनिहाय झालेले नुकसान झालेल्या पंचनाम्याची याची माहिती दिली. यावेळी कृषी विभागाचे काही अधिकारी गैरहजर असल्याचे सौ. सावंत यांच्या निदर्शनास आले. यावर तालुका कृषी अधिकारी परब यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जे अधिकारी उपस्थित नसतील त्यांचा अहवाल आपण तहसीलदारांना पाठविणार असल्याचे सौ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी डिंगणे सरपंच स्मिता नाईक यांनी ही परिस्थिती गंभीर असूनही महसूल विभाग परिस्थिती हाताळण्यास कमी पडल्याचा आरोप केला. नुकसान भरपाई मिळण्यास व पंचनाम्याचे प्रस्ताव पूर्ण करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे तालुका स्तरावरून एकत्रित सातबारे मागवा अशी मागणी सौ. नाईक यांनी केली.

तांबोळीचे माजी सरपंच शिवराम सावंत यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप करीत नुकसान होऊनही जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त 
भागाचा दौरा केला नाही, पालकमंत्र्यांनी तसे आदेश त्यांना द्यायला हवे होते. केवळ कागदी घोडे नाचवून आमची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. 

आम्हाला तुमचे पैसे, घरे किंवा जमीन नको तर शेतकऱ्यांसाठी काय योजना राबविणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

यावर अध्यक्षा सौ. सावंत यांनी यावर उपाय शोधून नुकसान भरपाई मिळावी यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांना इकडे येण्यास वेळ नसेल तर आपण सर्व शेतकरी त्यांच्याकडे जाऊन वस्तुस्थिती मांडू असे सांगितले; मात्र शिवराम सावंत यांनी याला आक्षेप घेत नुकसान आमचे झालेय, मी चार ते पाच लाख रुपये खर्च केले आहेत. आणि पुन्हा आम्हीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यास जावे हे चुकीचे आहे, असे सांगत भेटीला विरोध दर्शविला.

डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली. आढावा बैठकीला बांद्याचेच तलाठी पास्ते उपस्थित नसल्याने अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करीत त्यांचा अहवाल पाठवून द्या असे सांगत याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच गैरहजर महावितरण, वनविभागाच्या प्रतिनिधींना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश 
त्यांनी दिले.

या बैठकीला बांदा उपसरपंच अनुजा सातार्डेकर, नेतर्डे सरपंच अंकिता गवस, नेतर्डे ग्रामसेवक श्रीधर राऊळ, डिंगणे ग्रामसेवक ए. एल. परब, बांदा ग्रामसेवक डी. एल. अमृतसागर, इन्सुली ग्रामसेवक सी. व्ही. राऊळ, कोनशी सरमळे ग्रामसेवक एस. जी. परब, असनिये ग्रामसेवक पी. व्ही. ठाकूर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, एनआरएलएमचे शंकर नरबट, मृणाल कर्लेकर, विस्तार अधिकारी एस.डी. येरवळकर,पशुधन पर्यवेक्षक धनश्री परब(शेडगे),कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर,सुधाकर जाधव,विलवडे ग्रामसेवक पी.पी.देसाई, इन्सुली उपसरपंच कृष्णा सावंत,बालविकास प्रकल्प अधिकारी संचिता कुडाळकर,डेगवे उपसरपंच मधुकर देसाई आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसात भेट
माजी शिक्षण आरोग्य सभापती कामत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येत्या दोन दिवसात त्यांची वेळ घेण्यात येईल. तसेच त्यांनी या भागात येऊन पाहणी करावी यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे सांगत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

शासन भरपाईसाठी प्रयत्नशील
यावेळी पंचायत समिती सदस्य राऊळ यांनी जिल्ह्यातील प्रशासनाचे जरी दुर्लक्ष झाले असले तरी शासन या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहे. आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत असून येथील नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.