देवबागमध्ये पाणी वस्तीत घुसले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मालवण - जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर कायम आहे. आज दिवसभर पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी नुकसानीचे सत्र सुरूच राहिले. समुद्री उधाणाचा किनारपट्टीला मोठा फटका बसला. देवबागमध्ये भरतीचे पाणी वस्तीत घुसले. पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. तेथील २५ घरांना धोका निर्माण झाला आहे.

मालवण - जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर कायम आहे. आज दिवसभर पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी नुकसानीचे सत्र सुरूच राहिले. समुद्री उधाणाचा किनारपट्टीला मोठा फटका बसला. देवबागमध्ये भरतीचे पाणी वस्तीत घुसले. पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. तेथील २५ घरांना धोका निर्माण झाला आहे.

समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका तालुक्‍यातील देवबाग गावातील ख्रिश्‍चनवाडी, कुमठेकरवाडी तसेच विठ्ठल मंदिरनजीकच्या किनाऱ्यास बसला आहे. समुद्राच्या लाटांचे पाणी दगडी बंधाऱ्यावरून वस्तीत घुसल्याने या तिन्ही वाडीतील सुमारे २३ ते २५ घरांना धोका निर्माण झाला आहे. समुद्री लाटांच्या माऱ्यात एक संरक्षक भिंत तसेच शौचालयाची टाकी फुटल्याने नुकसान झाले आहे. उधाणाचा जोर असाच कायम राहिल्यास समुद्राचे पाणी थेट घरात घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, आज सायंकाळी मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर यांनी घटनास्थळी भेट देत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.

मुसळधार पावसाबरोबरच समुद्राला आलेल्या उधाणाचा पहिला फटका देवबागमधील ख्रिश्‍चनवाडीस आज बसला. गतवर्षीही ख्रिश्‍चनवाडीत समुद्राचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी किनाऱ्याच्या बाजूने संरक्षक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती; मात्र त्यावरील कार्यवाही झाली नाही. आज समुद्राला आलेल्या उधाणामुळे संरक्षक दगडी बंधाऱ्यावरून समुद्राचे पाणी ख्रिश्‍चनवाडीत, विठ्ठलमंदिर तसेच कुमठेवाडीत घुसले. यात विठ्ठल मंदिरनजीक राहणाऱ्या फर्नांडिस यांची संरक्षक भिंत समुद्राच्या लाटांच्या माऱ्यात जमीनदोस्त झाली. ख्रिश्‍चनवाडीतील बावतीस फर्नांडिस यांची शौचालयाची टाकी फुटून नुकसान झाले.

सीमाव फर्नांडिस यांचे घर किनाऱ्यालगतच असल्याने समुद्री लाटांचा मारा होऊ नये यासाठी त्यांनी स्वखर्चातून संरक्षक भिंत उभारली होती; मात्र समुद्राच्या लाटांच्या माऱ्यात ही संरक्षक भिंत जमीनदोस्त झाली. त्यामुळे फर्नांडिस यांच्या घरात समुद्राच्या लाटांचे पाणी घुसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर फर्नांडिस यांची किनाऱ्यालगत माड बागायत असून उद्याच्या दिवशीही उधाणाची स्थिती कायम राहिल्यास त्यांची माडबागायत नष्ट होण्याची भीती आहे. 

ख्रिश्‍चनवाडीतील बावतीस फर्नांडिस यांच्या घराबरोबरच डॅनिअल फर्नांडिस, सालू फर्नांडिस यांच्यासह अन्य दहा ते बारा घरांना, कुमठेकर वाडीतील एकनाथ कुमठेकर, संजय मोंडकर यांच्या घरांना तसेच विठ्ठल मंदिर येथील सीमाव फर्नांडिस, मंगेश कांदळगावकर यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या नुकसानीची माहिती मिळताच स्थानिक पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, पोलिस पाटील भानुदास येरागी, दादा कुर्ले, रमेश कद्रेकर यांनी घटनास्थळी भेट देत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. मंडळ अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला.

दगडी बंधारा उद्‌ध्वस्त
समुद्री लाटांच्या तडाख्यात देवबाग किनाऱ्यालगतचा दगडी बंधारा उखडून गेला आहे. लाटांच्या माऱ्याबरोबर संरक्षक बंधाऱ्याचे दगड वस्तीत पडत आहेत. आजच्या उधाणात समुद्राच्या लाटांचे पाणी वस्तीत घुसले होते. उद्याही उधाणाचा जोर कायम राहिल्यास या तिन्ही वाड्यांमध्ये समुद्राचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. 

जोर कायम
जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात सरासरी ५०.९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकावार २४ तासात व कंसात आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः दोडामार्ग ५६ (८८०), सावंतवाडी ६५ (८२०), वेंगुर्ले ४२.६ (७९८.४७), कुडाळ ४० (६८७), मालवण २३ (६४३), वैभववाडी ८४ (५८५).