मंडणगड किल्ला बनलाय वीकएंड पर्यटनस्थळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

सुविधांची मात्र वानवा - मद्यपींचा वाढता वावर; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

मंडणगड - बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकही सुटीच्या दिवसात मंडणगड किल्ल्याला भेट देत आहेत. किल्ल्यावरून दिसणारा मनोरम निसर्ग, अंगाला झोंबणारा गार वारा आणि हिरवा साज ल्यालेला परिसर नजरेत साठवण्यासाठी सारे गर्दी करीत आहेत. सेल्फी काढण्याची तर चढाओढ लागते. याला गालबोट लागते ते मद्यपींच्या वाढत्या संचारामुळे. याबाबत इतिहासप्रेमी व पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जाते. तेथे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

मंडणगड किल्ल्यावर जाण्याकरिता काही वर्षांपूर्वी डांबरी रस्ता झाला. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, पर्यटकांना किल्ल्यावर जाणे सोपे झाले. अनेकांचा मंडणगड किल्ला म्हणजे वीकएंड पर्यटनस्थळ झाले आहे. त्यातच पावसाळा सुरू असल्याने किल्ल्याने हिरवाईचा शालू परिधान केला आहे. नुकताच शासनाने तालुक्‍यातील बाणकोट किल्ल्याला नवा साज चढवणार असल्याचे जाहीर केले. मंडणगड किल्ल्याकडे शासन, प्रशासन व पुरातत्त्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटन विकासाची गाडी वेगाने नेण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. हा विषय चर्चेतच अडकला आहे. पुरेशा सोयीसुविधांअभावी पर्यटकांचा ओघ सुरू राहात नाही.

शहरापासून लांब असल्याने किल्ल्यावर वस्ती करणे हा खरेतर एक थरारक अनुभव आहे. किल्ल्यावर दोन तळी, एक मंदिर, ढासळलेली तटबंदी व एक तोफ आहे. मानवी वावरांमुळे किल्ल्यावर चांगल्या बरोबरच वाईट गोष्टीनाही प्रोत्साहन मिळण्याची शक्‍यता आहे. प्रेमीयुगुलांचा वावर, मद्यपींचा धुमाकूळ हे मानवी वावरचे दुष्परिणामही पुढे आले आहेत. अन्य किल्ल्यांप्रमाणेच मंडणगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देऊन संरक्षित करणे गरजेचे आहे. ऐतिहासिक वारसा पुरेसा नसून पर्यटकांनी किल्ल्यावर यावे, असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यात संग्रहालय, उद्यान, तळ्यात बोटिंगसारख्या उपक्रमांचा समावेश होऊ शकतो.

मंडणगड किल्ला पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर, शिवकालीन तलाव, किल्ल्यावरून दिसणारा भोवतालचा नयनरम्य प्रदेश, तोफ, गणपती मंदिर, दर्गा हे सार पाहण्यासारखे आहे. तलावात बोटिंग सुरू करण्यात यावे. किल्ल्याचे वैभव पर्यटकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे.
- अंकित खेरटकर, पर्यटक