झाडांचे ‘पाणीदार बुंधे’ त्यांच्यासाठी जगण्याचा आधार

झाडांचे ‘पाणीदार बुंधे’ त्यांच्यासाठी जगण्याचा आधार

दोडामार्ग - थेंब थेंब पाण्यासाठी मांगेलीतील महिलांची दिवस-रात्र धडपड सुरू आहे. कडेकपारीतील झाडांचे ‘पाणीदार बुंधे’ त्यांच्यासाठी जगण्याचा आधार बनले आहेत. नियमांवर बोट ठेवत प्रशासनाने त्यांना पाणी नाकारलं असलं, तरी निसर्ग मात्र त्यांना जगवण्यासाठी कडेकपारीतील झाडाझाडांतून थेंबा थेंबाने झरतो आहे आणि त्यांची तहान भागवतो आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या मांगेलीतील महिलांची ही परवड अस्वस्थ करणारी आहे.

मांगेली हा दोडामार्गपासून सुमारे २५ किलोमीटर असलेला निसर्गसंपन्न गाव. कर्नाटकातून आलेले हत्ती पहिल्यांदा महाराष्ट्रात उतरले ते याच गावात. हत्तींचे प्रवेशद्वार अशी मांगेलीची ओळख. त्याच गावात आज पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. गावोगाव ओहोळ सुकले आहेत. नदीपात्रे कोरडी पडत आहेत. गावठणवाडी आणि टेंबवाडी मिळून बनलेल्या देऊळवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. गावठणवाडीत तर थेंब थेंब पाणी गोळा करण्याची वेळ तेथील महिला मुलांवर आहे. अगदी पहाटेपासून पाणी गोळा करण्यासाठी वाडीजवळच्या कडेकपारीत त्यांना ठाण मांडून बसावे लागत आहे. वाडीवस्तीजवळ असलेल्या कोरड्या ओहोळाच्या काठावरील झाडांच्या बुंध्यामधील झिरपणारे पाणी काळ्या कातळाच्या खोबणीत जमा झाले की ते करवंटीने आपल्या कळशीत भरून घरी न्यावे लागत आहे.

गावातील नळयोजना जवळपास १२-१३ वर्षे बंद आहे. नळयोजनेसाठी वापरलेले पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याच्या दाबामुळे ते फुटत राहिले. लोकांना पाणी देण्यासाठी मग त्याच योजनेवर पुन्हा पुन्हा पाण्यासारखा पैसा खर्च केला; पण गावकऱ्यांना पाणी काही मिळाले नाही. आता कुठे एप्रिल मध्यावर आलाय. अजून मे महिना बाकी आहे. त्या काळात पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे. सध्या कोरड्या ओहोळाच्या काठावरील पाणीदार बुंध्यामधून झाडांच्या मुळांमधून थेंब थेंब पाणी मिळते आहे. दशकाहून अधिक काळ तिथल्या गावकऱ्यांची परवड सुरु आहे. महिलांना दिवसभराचे रोजगार बुडवून पाण्यासाठी झाडाखाली रांगा लावाव्या लागताहेत. पाणी भरण्यावरुन अधून मधून खटके उडताहेत, संघर्ष होतो आहे. दुसरीकडे नळयोजना दुरुस्त होईल आणि घरात नळपाणी येईल यावर लोकांचा आता विश्‍वास उरलेला नाही. त्यामुळे ओहोळातील दगडगोटे तुडवीत, काळेधर दगडाची धारदार पाती चुकवत, कोरड्या ओहोळावरची चढण आणि उतार पार करत महिलांना पाणी गोळा करावेच लागत आहे.

एकीकडे पाण्यासाठी वणवण सुरु आहे तर दुसरीकडे प्रशासन नियमावर बोट ठेवून आहे. अस्तित्वात असलेली नळपाणी योजना लाखो रुपये खर्चूनही गावकऱ्यांना महिनाभर पाणी देऊ शकलेली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा खर्चही घातला; पण पाणी मात्र गावकऱ्यांच्या घरात पोचलेले नाही. दुरुस्ती खर्चाची मर्यादा संपल्याने पूरक नळयोजनेसाठी प्रस्ताव करावयाचा आहे; पण त्यासाठी पूर्वीच्या नळयोजनेचा विशिष्ट कालावधी पूर्ण व्हायला हवा अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याने ग्रामपंचायतीला दिला आहे. लाखो रुपयांची नळयोजना गावकऱ्यांना लोटाभर पाणी देऊ शकली नाही, ठेकेदार, अधिकारी आणि तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी नळयोजना अख्खी पोटात घातली असली तरी आता नव्याने नळयोजना करण्यासाठी तेच अधिकारी नियम दाखवत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे त्यांच्या त्या ‘जाऊ तिथे खाऊ’ वृत्तीमुळे सर्वसामान्य गावकरी मात्र पाण्याच्या एका थेंबालाही महाग झाले आहेत. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मांगेलीच्या सरपंच सौ. सुहानी गवस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्या बाहेरगावी गेल्याने भेटल्या नाहीत. त्यांचे पती सुनील भेटले. त्यांनी प्रशासनाची बाजू मांडली.

सबबी सांगण्यात धन्यता
ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय लोकांना पाणी देण्याऐवजी अनेक सबबी सांगत आहेत. गटविकास अधिकारी सिद्धार्थ आजवेलकर यांनी तर मागच्या पंचायत समिती बैठकीत तालुक्‍यात पाणीटंचाईच नाही, असे जाहीर करून पाण्यासाठी अनेक अग्निदिव्ये पार पाडणाऱ्या महिलांच्या जखमेवरच मीठ चोळण्याचाच प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com