आंब्याच्या झाडांना दुसऱ्यांदा मोहर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

वाढलेल्या थंडीचा परिणाम - मंडणगडातील चित्र; फळधारणा मात्र अल्पच

मंडणगड - महिन्याभरापूर्वी एकाच झाडाच्या काही फांद्यांना मोहर, तर काहींना पालवी असे संमिश्र चित्र तालुक्‍यात दिसत होते; मात्र तीन दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे पालवी फुटलेल्या फांदीला मोहर फुटण्याची क्रिया सुरू आहे. त्यामुळे झाडाला दुसऱ्यांदा मोहर फुटला आहे. असे असले तरी आधी मोहरलेल्या फांदीला फळधारणा मात्र अल्प दिसून येत आहे.

तालुक्‍यात चांगले वातावरण निर्माण झाले असून पडणाऱ्या थंडीचा फायदा आंब्याबरोबर काजूलाही झाला आहे. सध्या जिल्ह्यातील किमान तापमान 13 ते 17 अंशांपर्यंत स्थिर आहे. दापोलीतील तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत उतरले आहे. पारा खाली आल्यामुळे हवेत चांगलाच गारवा आहे. सकाळच्या वेळेस धुके पडत असून दवांमुळे जमीन ओली होत आहे. दुपारच्या वेळेस कडक ऊन असले, तरी गारठ्यामुळे पालवी फुटलेल्या झाडांना मोहर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी फळधारणा म्हणावी तशी झालेली नाही. आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्‍यक आहे. थंडी चांगल्याप्रकारे पडली नाही, तर आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे येत नाही. त्याचा फळ उत्पादनावर परिणाम दिसून येतो. गेल्या काही वर्षांपासून कोकणातील आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. मोहर, फळधारणा, फळांची वाढ यावर परिणाम दिसतो आहे. आंब्याच्या जातीपरत्वे आंब्याला मोहर येतो. काही हापूस कलमांना एक वर्ष आड मोहर येतो. नीलम, रत्ना या जातींना दरवर्षी मोहर येतो. थंडी आणि पाण्याच्या ताणासह झाडाबाहेरील घटकदेखील मोहर येण्यासाठी तितकेच आवश्‍यक आहेत.

""तालुक्‍यात वाढणाऱ्या थंडीचा फायदा निश्‍चितच आंब्याला होत आहे. त्यामुळे उशिरा पालवी फुटलेल्या फांद्यांना मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र काही ठिकाणी अवकाळी पडलेल्या पावसाने वातावरणात बदल झाल्याने त्याचा फटका आधी आलेल्या मोहरावर बसला. त्यामुळे फळधारणा अल्प दिसून येत आहे. थंडी वाढल्यास किंवा कमी झाल्यास याचा फटका मोहराला बसू शकतो. सद्यःस्थितीत वातावरण पोषक आहे.''- संजय रेवाळे, शेती अभ्यासक, मंडणगड

Web Title: mango tree flowering