जखमी निलकंठ पक्षाच्या पिल्लाला मिळाले जिवदान

Nilkanth-Bird
Nilkanth-Bird

पाली (रायगड) : माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील कुंडलिका विद्यालयातील काही अादिवासी विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. २०) सकाळी कावळ्यांनी जखमी केलेले निलकंठ पक्ष्याचे पिल्लू सापडले. या विद्यार्थ्यांनी त्या पिल्लाची कावळ्यांपासून सुटका करुन त्याचे प्राण वाचवले. जखमी निलकंठची सुश्रूषा व देखभाल करण्याची जबाबदारी शाळेतील संघर्ष जगताप या अादिवासी विद्यार्थ्याने उचलली आहे.

मंगळवारी (ता.२०) सकाळी शाळेत येतांना कुंडलिका विद्यालयातील इयत्ता दहावी व सातवीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेजवळ वाटेत जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले निलकंठ पक्षाचे पिल्लु दिसले. जवळ जाऊन पहिले असता ते उडू शकत नव्हते हे त्यांच्या निदर्शनास आले आणि मग त्यांनी त्याला पकडून शाळेत आणले. दहावीत शिकणारा दिनेश वाघमारे व सातवीतील संघर्ष जगताप यांचा यामध्ये पुढाकार होता. शाळेतील शिक्षक अाणि निसर्ग व प्राणी-पक्षी अभ्यासक राम मुंढे यांनी त्या पिल्लाचे परिक्षण केले. इतर शिक्षकांनी देखिल या बाबत विद्यार्थ्यांना विचारले. 

कावळ्यांनी त्या पक्षावर हल्ला करून घायाळ केले असे त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी त्याला भूक लागली तेव्हा त्याने गहू आणि छोटे छोटे किडे खाल्ले. जखमी अवस्थेतील निलकंठला उडता येत नव्हते. त्याला तसेच सोडून दिल्यास पुन्हा कावळे किंवा इतर प्राण्यांनी त्याला मारुन टाकले असते. मग शाळेत सातवीत शिकणाऱ्या संघर्ष किसन जगताप या विद्यार्थ्याने त्याच्यावर उपचार करुन जगवण्याची व पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. संघर्षला प्राणी व पक्षांबद्दल प्रेम व आवड तर आहेच शिवाय त्यांच्या विषयी सखोल ज्ञान देखील आहे. त्यामुळे त्याच्या घरी अाता निलकंठ सुखरुप अाहे. निलकंठ बरा झाल्यानंतर उडू लागल्यावर त्याला जंगलात सोडून देईन असे संघर्षने सकाळला सांगितले. घरातील आई व वडील निलकंठ पक्षाला देव मानतात असे संघर्षच्या आठवीत शिकणाऱ्या आदर्श या भावाने सकाळला सांगितले.

अादिवासी मानतात निलकंठला देव
शाळेतील काही आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक विचारले असता त्यांनी नीलकंठ या पक्षाविषयी असे सांगितले की, आम्ही या पक्षाला देव मानतो आणि या पक्षाला पकडत नाही व शिकार सुद्धा करत नाहीत. त्यामुळे अापोअापच या पक्षाचे संवर्धन व संरक्षण होते.

निलकंठ बद्दल अनेक समज-गैरसमज
इयत्ता सातवीतील दुसऱ्या एका आदिवासी विद्यार्थ्याने सांगितले की जर हा पक्षी आपल्या अंगावरून उडून गेला की तो माणूस कंबरेतून वाकतो म्हणजेच त्या माणसाला पोक (बाक) येतो. आता ही अंधश्रद्धा म्हणावी का त्या पक्षाची शिकार होऊ नये म्हणून केलेली युक्ती म्हणावी, मात्र ही एक त्याच्या विषयी भीती निर्माण केली असावी कारण त्याचे संरक्षण व्हावे. महत्वाचे म्हणजे या पक्षाची शिकार केलेली कधी आढळत नाही. नीलकंठ नाव का पडले याची आख्यायिका अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रमंथनामधून मिळालेले विष ग्रहण केल्यामुळे शंकराला नीलकंठ म्हणतात. त्याच प्रमाणे हा पक्षी विंचू खातो व विंचवाचे विष पचवतो त्यामुळे त्याचे नांव नीलकंठ पडले असे राम मुंढे यांनी सकाळला सांगितले.

अाकर्षक अाणि मनमोहक निलकंठ
पूर्ण वाढ झालेल्या निलकंठ पक्षाची लांबी साधारणतः 33 सेंमी इतकी असते. निलकंठ रस्त्याच्या कडेला विजेच्या अाणि कुंपणाच्या सिमेंटच्या किंवा लोखंडी खांबावर किंवा तारेवर नेहमी बसलेला आढळतो. एका जागेवर शांत बसून मग शेतामध्ये काही कीटक, बेडूक, सरडे इत्यादी दिसले की अलगद झेप घेऊन पंखांचा विस्तार करून पकडून भक्ष्य पकडतो. विंचू हे त्याचे आवडते खाद्य अाहे. चोच थोडी टणक असते, एका जागेवर बसल्या नंतर मोठा आवाज काढतो आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. पंखांचा विस्तार केल्यानंतर पंखावर निळी आणि आकाशी रंगाची अाकर्षक छटा लक्ष वेधून घेते. जखमी अवस्थेतील निलकंठला सांभाळल्यास दुष्परिणाम काही नाहीत उलट त्या पक्षाला नवीन जीवन मिळेल, असे निसर्ग व प्राणी-पक्षी अभ्यासक राम मुंढे यांनी सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com