कुपोषित बालकांच्या संख्येत सुधागड तालुका नंबर दोनवर

Sudhagad
Sudhagad

पाली : सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुपोषीत बालके आढळली आहेत.  बुधवारी (ता.14 ) पाली तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा व अन्य सदस्यांनी कुपोषणाच्या मुद्द्यावर सबंधीत अधिकार्‍यांना जाब विचारला. 

मुंबईतील डॉक्टर फॉर यू या संस्थेने सुधागड तालुक्यात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात 32 मुले कुपोषीत आढळल्याचा अहवाल दिला आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत पाठोपाठ सुधागड तालुक्याचा कुपोषीत बालकांच्या संख्येत दुसरा क्रमांक लागतो असे यावेळी सांगण्यात आले.  यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी एस.एस. कवितके यांनी कुपोषीत बालकांची योग्यरित्या तपासणी व त्यांना नियमीत पोषक आहार पुरविला जात असून कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती दिली. 

यावेळी पोषण आहार या विषयावर सभापती साक्षी दिघे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत घरकुल योजनेत झालेल्या अनागोंदी कारभारावर देखील गदारोळ झाला. परशुराम कदम रा.पुई यांच्या नावे आलेल्या घरकुलाच्या निधीची रक्कम अन्य खातेदाराच्या खात्यात जमा होवून मुळ लाभार्थी वंचीत राहिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अशा प्रकारे घरकुल निधीपासून आजही अनेक लाभार्थी वंचीत असल्याने त्यांना लवकर निधी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी सुचना या बैठकीत करण्यात आली. वारंवार खंडीत होणाऱ्या बिएसएनएल दुरध्वनी व इंटरनेट सेवेबद्दल नागरीकांनी तक्रार केली. तसेच बिएसएनएलच्या जमीनि खालून जाणार्‍या ऑप्टीकल फायबर केबल केवळ दोन ते अडीच फुटाखालून टाकल्या जात आहेत. त्या केबल पाच फुट जमीनीखालुन टाकण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. सुधागड तालुक्यासाठी  बिएसएनएल चा प्रभारी अधिकारी असून कामकाज सुरळीतपणे पार पाडून नागरीकांना सातत्यपुर्ण सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र अधिकारी  नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. सुधागड तालुक्यातील शाळांतील स्थलांतरीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करुन अशा विद्यार्थ्यांना तालुक्यातील तीन विनाअनुदानीत आश्रमशाळेत दाखल करुन घ्यावे, शुन्य पटसंख्या असलेल्या शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. अशा पडीक शाळांच्या इमारतीची दुरुस्ती करुन सदर शाळा वापरात आणाव्यात. अशी सुचना यावेळी करण्यात आली. यावेळी सुधागड तालुक्यात काही महिनाभरापुर्वी झालेल्या वृध्द महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विषय चर्चेत आला असता पोलीस उपनिरिक्षक एन.डी.चव्हाण यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले की सदर महिलेवर बलात्कार अथवा खुन झाला नसून तिचा नैसर्गीक मृत्यू झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यावेळी लता कळंबे यांनी जांभुळपाडा धोकादायक पुलाच्या दुरुस्तीकामी होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रश्न उपस्थीत केला. या बैठकीत विविध  विभागाशी निगडीत विषयांवर विस्तृत चर्चा होवून प्रश्न व समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने या महत्वपुर्ण सुचना देण्यात आल्या. 

या बैठकीस सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, पाली-सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, पाली-सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर, नायब तहसिलदार वैशाली काकडे, समन्वय समिती सदस्य राजेंद्र राऊत, अशोक मेहता, चंद्रकांत घोसाळकर, निहारीका शिर्के, आरती भातखंडे, आदिंसह जांभुळपाडा सरपंच गणेश कानडे, लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे, रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिच्छंद शिंदे, राजेंद्र गांधी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व नागरीक उपस्थीत होते. 

प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि जनतेने योग्य समन्वय साधून काम करुन सुधागड तालुक्याचा विकासाचा स्थर उंचावण्याच्या दृष्टीने सहाकार्य करावे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी लोकसेवकांच्या दबावतंत्राखाली काम न करता लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याच्या दृष्टीने काम करावे.
- राजेश मपारा, अध्यक्ष,  सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com