सरत्या वर्षाला निरोप, नववर्ष स्वागतासाठी 'बुकिंग फुल' 

representational image of Vengurla Beach
representational image of Vengurla Beach

सावंतवाडी / रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह गोव्याची किनारपट्टी सज्ज झाली आहे. गोवा आणि सिंधुदुर्गात एक महिना आधीच, 4 जानेवारीपर्यंतची हॉटेल बुकिंग फुल्ल आहेत.

व्यावसायिकांनीदेखील जय्यत तयारी केली आहे. ऐनवेळी येणाऱ्यांना पर्यटकांची गैरसोय होऊ शकते, तसेच त्यांना मनमानी पॅकेज घ्यावे लागू शकते. रत्नागिरी जिल्हा मात्र अद्याप पॅकेजेस-इव्हेंटपासून दूर आहे. कौटुंबिक पर्यटनावरच येथे भर आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड आणि वेंगुर्ले तालुक्‍यांतील किनारपट्टीवर 'इयरएंड'ला पर्यटनासाठी मोठी गर्दी असते. साधारण दीड ते दोन लाख पर्यटक चार ते पाच दिवसांत जिल्ह्याच्या किनारपट्टीला भेट देतात. यात सर्वाधिक पसंती मालवण, तारकर्ली या ठिकाणांना असते. महिनाभर आधीच बहुसंख्य हॉटेलचे बुकिंग फुल आहे. 

याआधी एका रात्रीसाठी सर्वाधिक पॅकेज 10 हजार रुपये असायचे. या वर्षी निवतीत तब्बल दीड लाखाचे पॅकेज विदेशी पर्यटकांसाठी देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ते बुकही झाले आहे. छोटी मोठी हॉटेलही हाउसफुल झाल्याचे चित्र आहे. मालवण, तारकर्ली, देवबाग, आचरा, देवगड, निवती, शिरोडा याबरोबरच किनारपट्टीलगतच्या गावांतही निवासव्यवस्था उपलब्ध असून, बहुतेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग झाल्याची माहिती आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग असे प्रकार पर्यटकांसाठी यापूर्वीच खुले केले आहेत. या वर्षी मालवणमध्ये वॉटर पार्क ही नवी संकल्पना नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर खुली झाली आहे. 

मुरड, कर्दे, गुहागर, गणपतीपुळेला पसंती 
गुहागर :
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन उद्योग मात्र पॅकेजेस, इव्हेंटपासून अजूनही दूरच आहे. येथे नाताळच्या सुटीत अनेक कुटुंबे स्वतंत्रपणे येतात. फिरण्याचा स्वतंत्र कार्यक्रम आखला जातो. नववर्षाचे स्वागतही आपापल्या पद्धतीने केले जाते. नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी मुरड, कर्दे, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी येथील समुद्र किनाऱ्यांना सर्वाधिक पसंती पर्यटकांकडून मिळते. हॉटेल, घरगुती राहण्याची सोय असलेली ठिकाणे पर्यटकांनी भरून जातात. छोटी कुटुंबे, छोटे ग्रुप समुद्र पर्यटनासह येथील विविध स्थळांना भेटी देऊन आनंद लुटतात. 

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या ऍडव्हेंचर स्पोर्टसच्या सुविधेचा पर्यटक लाभ घेतात. नौकाविहाराचाही आनंद घेतात. काही हॉटेलमध्ये नववर्षाच्या स्वागताकरिता नमन, शक्तितुरा अशा स्थानिक कलांसोबत छोटे ऑर्केस्ट्रा आयोजित केले जातात. मोकल यांच्या सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीतर्फे रात्रीच्या वेळी खाडी सफर घडवली जाते.

ग्लोबल टुरिझम चिपळूण ही संस्था वाशिष्ठी नदीतील मगर दर्शन महोत्सवाचे आयोजन करते. दरम्या,स्थ्थिानिक केटरर्स, खाणावळी यांचीही लगबग सुरू आहे. मोदक, वडे घाटले, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटण वडे, भंडारी पद्धतीचे चिकन, ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहाराची उपलब्धता करून पर्यटकांची हौस भागविली जाते. 

डिसेंबर सेलिब्रेशनसाठी गोवा सज्ज 
पणजी :
डिसेंबर महिन्यातील पर्यटनासाठी गोवा दोन महिन्यांपासून सज्ज असतो. डिसेंबर 24 ते 1 जानेवारीपर्यंत गोव्यात सलग सहा दिवसांची किंवा अगदी दोन ते तीन दिवसांची सुटी काढून येणारा पर्यटकवर्ग लाखोंच्या घरात आहे. गोव्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळांसह तेथे असणारी हॉटेल्स, त्यांचे दरपत्रक आणि बुकिंगबाबतची माहिती गुगलवर एका क्‍लिकच्या माध्यमातून मिळते आणि सहलीचे नियोजन करणे सोपे होते.

जे लोक या हंगामात ऐनवेळी येतात त्यांच्यासाठी पर्यटन खर्चिक होण्याची दाट शक्‍यता असते. बऱ्याचदा ऐनवेळी हजेरी लावणाऱ्या मंडळींना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध न झाल्याने स्वारी माघारी फिरविणे किंवा गैरसोय करून कोठेही राहावे लागते. असे प्रकार टाळण्यासाठी बस, रेल्वे किंवा विमानसेवेचे तिकीट बुकिंगसह राहण्याबाबतची, फिरण्याबाबतची तयारी म्हणून आधी बुकिंग करणे सोयीचे ठरते. 

दृष्टिक्षेपात तयारी 

  • सिंधुदुर्गातील निवतीत विदेशी पर्यटकांसाठी तब्बल दीड लाखाचे पॅकेज, बुकिंग फुल. 
  • मालवण, तारकर्ली, देवबाग, आचरा, देवगड, निवती, शिरोड्यासह किनारपट्टीलगतच्या गावातही निवास व्यवस्था उपलब्ध, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग 
  • पर्यटकांसाठी पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगची सुविधा 
  • नववर्ष स्वागतासाठी नमन, शक्तितुरा अशा स्थानिक कलांसोबत ऑर्केस्ट्राचे आयोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com