प्रार्थनास्थळ व्यवस्थापन मालकीवरून हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

खेड - खेड शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापकीय मालकी हक्कावरून दोन गटांत झालेल्या वादावादीतून परस्पराविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांतील 28 जणांच्या विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रार्थनास्थळाच्या इमारतीत असलेल्या दुकानगाळ्यांच्या भाड्याची वसुली नोटीस देण्यासाठी आलेल्या वक्‍फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला या वादावादीतून एका गटाने मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

खेड शहरातील सफा मशिदच्या व्यवस्थापनाची मालकी कुणाची यावरून सैफराज यासीन ऊर्फ हसीन पोत्रीक व इक्‍बाल पांगारकर यांच्यामध्ये वाद आहेत. एका गटाच्या म्हणण्यानुसार, या प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वक्‍फ बोर्डाकडे सोपवण्यात आली आहे; परंतु दुसऱ्या गटाला ते मान्य नाही. व्यवस्थापनाच्या मालकीबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असताना ती जबाबदारी वक्‍फ बोर्डाला कशी दिली, हा दुसऱ्या गटाच्या प्रश्‍न आहे.

दोन गटांमध्ये हा वाद धुमसत असतानाच शुक्रवारी (ता. 31) दुपारी वक्‍फ बोर्डाचे अधिकारी खुसरो खान व जब्बार शेख हे दोघेजण प्रार्थनास्थळाच्या इमारतीत असलेल्या दुकान गाळ्यांच्या भाडे वसुलीची नोटीस बजावण्यासाठी औरंगाबादहून खेड येथे आले होते. या अधिकाऱ्यांनी दुकान गाळेधारकांना नोटिसा बजावण्यास सुरवात करताच दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली. गेले वर्षभर धुमसत असलेला वाद पुन्हा उफाळून आला. वक्‍फ बोर्डाचे अधिकारी खुसरो खान व जब्बार शेख, गाळेधारक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विषयाने गंभीर वळण घेतल्याने मोठा जमाव जमा झाला. पोलिसांनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत परस्पराविरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनील गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एल. चव्हाण, आनंदा पवार तपास करीत आहेत.

परस्परविरोधी आरोप व गुन्हे दाखल
यावेळी वक्‍फ बोर्डाचे अधिकारी खुसरो खान यांनी इक्‍बाल पांगारकर, सर्फराज पांगारकर, फारूख पोत्रिक, मुबारक गजाली, वहीद कडवेकर, अतिज अहमद मणियार, आरिफ मुल्लाजी, माहमुद पांगारकर या आठजणांनी आपल्याला आणि सहकारी जब्बार शेख यांना धक्काबुकी करत मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप केला. पोलिसांनी या आठही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या गटांकडून सैफराज यासीन ऊर्फ अशरफ पोत्रिक यांनी बेकायदा जमाव करून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत वक्‍फ बोर्डाचे अधिकारी खुसरो खान, जब्बार शेख, तसेच मुख्त्यार अहमद मुकादम व अन्य 17 जणांविरोधात तक्रार दाखल केली. खेड पोलिसांनी याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Masjid ownership dispute; FIR lodged