मॉन्सून वेळेतच दाखल होणार

मॉन्सून वेळेतच दाखल होणार

मच्छीमारांचा अंदाज - आगमनाचे संकेत समुद्राकडून मिळेनात

मालवण - अंदमानात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा अंदमानात काही दिवस अगोदर मॉन्सून दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावली आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाले असले तरी कोकण किनारपट्टीच्या भागात सर्वसाधारणपणे नेहमीप्रमाणे ७ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होईल, असे संकेत निसर्गाकडून, विशेषतः समुद्राकडून मिळत आहेत. याला स्थानिक मच्छीमारांनीही दुजोरा दिला आहे. 

यावर्षी पावसाचे आगमन लवकर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार यावर्षी अंदमानात मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पाऊस लवकर पडेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. यात दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता मे महिन्यात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम राहिला नसल्याचे दिसून आले आहे. सर्वसाधारणपणे ७ जूनच्या दरम्यानच किनारपट्टी भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. यामुळे यंदाही याचदरम्यान कोकण किनारपट्टी भागात मॉन्सून दाखल होईल, असे संकेत निसर्गाच्या वेध शाळेतून मिळत आहेत.

जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात रविवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात दक्षिणेकडील वाऱ्याचा जोरही वाढला असल्याचे दिसून आले. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन लवकर होईल अशी चिन्हे दिसून येत होती. समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात होणाऱ्या बदलांचा सर्वात प्रथम अंदाज येतो. मॉन्सूनचे आगमन किनारपट्टी भागात कधी होणार हे मच्छीमार बांधव समुद्रात होणाऱ्या बदलांवरून जाणतात. या अनुषंगाने स्थानिक मच्छीमार बाबू ढोके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘‘दोन दिवसापूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गेले काही दिवस समुद्रात मासेमारी करताना पावसाळी वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून आले. समुद्रात काही बदल होत असल्याने याचा मासेमारीबरोबरच स्कूबा, स्नॉर्कलिंग या पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र सोमवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसाबरोबरच दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर पाहता समुद्रातील वातावरण आणखीनच स्वच्छ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी सध्याचे समुद्रातील वातावरण मासेमारीबरोबरच स्कूबा, स्नॉर्कलिंग या व्यवसायासाठी पोषक असल्याचे चित्र आहे.’’ पावसाळी वातावरणाचा सर्वात पहिला परिणाम समुद्रात होत असल्याचे दिसून येते. समुद्रात अंतर्गत होणाऱ्या बदलांवरून तसेच पाण्याचा करंट यावरून पाऊस केव्हा पडणार याचा अंदाज मच्छीमार बांधव बांधतात. सद्यःस्थितीत समुद्रात असे कोणतेही बदल झाले नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे समुद्रातील वातावरण स्वच्छ झाले असून अजून दहा ते बारा दिवस मासेमारीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पर्यटन हंगाम तेजीत असल्याने तसेच पडलेल्या पावसामुळे स्कूबा, स्नॉर्कलिंग करता येईल का अशी चिंता व्यावसायिकांमध्ये होती. मात्र समुद्रात झालेला बदल पाहता स्कूबा, स्नॉर्कलिंगला चांगले वातावरण असल्याचे दिसून आले आहे. 

अनुभवसिद्ध मच्छीमारांकडून अंदाज
वेधशाळेचे अंदाज बऱ्याचदा चुकतात. असे असले तरी या अंदाजांना शास्त्राची जोड असते. मात्र निसर्गातूनही पावसाच्या आगमनाबाबत संकेत मिळत असतात. कोकणातील मच्छीमार विशेषतः पावसाबाबत समुद्रातील विविध बदल ओळखून पिढ्यान्‌पिढ्या अचूक अंदाज बांधत आले आहेत. समुद्रातील बदलते करंट, समुद्राच्या लाटांचा वेग, वाऱ्याची दिशा, विशिष्ट प्रकारच्या माशांच्या हालचाली अशा कितीतरी गोष्टी पावसाच्या आगमन व स्वरूपाविषयी अंदाज देत असतात. अनुभवसिद्ध मच्छीमार यातून अचूक अंदाज बांधतात. आताही एकूण स्थिती पाहता मच्छीमार माॅन्सून लवकर येणार नाही; तर नेहमीच्या वेळेतच पोहोचेल, असे सांगत आहेत.

समुद्राच्या पोटातील कचरा बाहेर पडतोय

सद्यःस्थितीत समुद्रात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नसला तरी काही भागात समुद्राच्या पोटातील कचरा किनाऱ्यावर पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठराविक किनारपट्टी भागात गेल्या दोन-तीन दिवसांत समुद्रातील कचरा किनाऱ्यावर पडत असल्याचे दिसून आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास कोकण किनारपट्टी भागात ३० मेच्या दरम्यान मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यताही स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. 
दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांची धांदल उडाल्याचे दिसून आले. मत्स्य हंगामाचा शेवटचा टप्पा असल्याने मच्छीमार मासळीची चांगली कॅच मिळेल अशी आशा बाळगून आहेत. त्यामुळे काही मच्छीमारांनी आपल्या यांत्रिक नौका समुद्रातच ठेवल्या आहेत. तर काही मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर ओढण्यास सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com