भरपावसात मोरी माशांचा सुकाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

मच्छीमार खूश - जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठी कॅच
मालवण - पावसाचा जोर कायम असला तरी समुद्र काहीसा शांत आहे. सध्या पावसाळी मासेमारी बंदी कालावधी असतानाही किनाऱ्यालगत काही प्रमाणात मासेमारी केली जात आहे. यात गेल्या दोन दिवसांत मच्छीमारांना मोरी मासळीची मोठी कॅच मिळाल्याने ते सुखावले आहेत.

मच्छीमार खूश - जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठी कॅच
मालवण - पावसाचा जोर कायम असला तरी समुद्र काहीसा शांत आहे. सध्या पावसाळी मासेमारी बंदी कालावधी असतानाही किनाऱ्यालगत काही प्रमाणात मासेमारी केली जात आहे. यात गेल्या दोन दिवसांत मच्छीमारांना मोरी मासळीची मोठी कॅच मिळाल्याने ते सुखावले आहेत.

मासेमारी हंगामाचा विचार करता गेली दोन वर्षे मच्छीमार मत्स्यदुष्काळ आणि अंतर्गत संघर्ष यातच अडकला. मासेमारी हंगामात स्थानिक मच्छीमारांना परप्रांतीय हायस्पीड व पर्ससिनच्या नौकांमुळे होणारी घुसखोरी डोकेदुखी ठरत होती; मात्र पर्ससिनच्या मासेमारीवर शासनाने निर्बंध घातल्याने पारंपरिक मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. सद्यःस्थितीत पावसाळी मासेमारी बंदी असताना जिल्ह्यातील काही बंदरांमध्ये अनधिकृतरीत्या मिनी पर्ससिनच्या साह्याने मासेमारी केली जात असल्याची तक्रार सहायक मत्स्य आयुक्तांकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली. गेले काही दिवस पावसाचा जोर वाढला आहे; मात्र खवळलेला समुद्र काहीसा शांत असल्याने किनाऱ्यालगत मासेमारी केली जात आहे. यात गेल्या दोन दिवसांत मच्छीमारांना मोरी मासा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. या मासळीला चांगला दरही मिळत आहे. या मासेमारीसाठी विशिष्ट प्रकारचे जाळे असून यात मत्स्यबीज व मत्स्य उत्पादनाची हानी होत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. या मासळीला सध्या चांगला दर मिळत असून नव्या मत्स्य हंगामाच्या प्रारंभापूर्वीच मच्छीमार सुखावल्याचे चित्र किनारपट्टी भागात आहे.

ऐन पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात मोरी मासळी उपलब्ध झाल्याने मत्स्य खवय्यांचीही चांगली चंगल झाली आहे. किनारपट्टीवर सध्या उपलब्ध झालेल्या मोरी मासळीचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहे. पावसाळ्यात येथील पर्यटन काहीसे मंद असल्याने काही ठराविक हॉटेल्सच सुरू असतात. त्यामुळे उपलब्ध मासळीस असणारी मागणी व पुरवठा याचा विचार करता ती सर्वसामान्यांना परवडेल अशीच आहे.