पत्नीचा खून करून मृतदेह गोधडीत लपवला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मंडणगड - किरकोळ वादावादीतून रमेश लक्ष्मण वाघमारे (वय 40, रा. पन्हळी खुर्द) याने पत्नीच्या डोक्‍यात कोयत्याचे घाव घालून तिचा निघृण खून केला. तिचा मृतदेह घरातच गोधडीत लपवून तो फरारी झाला. हा प्रकार बुधवारी (ता. 5) उघड झाला. पोलिसांनी गुरुवारी दुपारी तालुक्‍यातील मौजे पाट येथे सापळा लावून त्याला अटक केली. रमेश लक्ष्मण वाघमारे (वय 40, रा. पन्हळी खुर्द) असे त्याचे नाव आहे. पत्नीने जेवण केले नाही, अशा क्षुल्लक बाबीवरून पत्नीला 29 मार्च रोजी खून केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वास गोळे यांनी दिली.

मौजे पन्हळी खुर्द येथे गावापासून दूर असलेल्या एका बंद घरातून दुर्गंधी येत होती. मात्र, घर बाहेरून बंद होते. गावातील एका नागरिकाने पन्हळीचे पोलिस पाटील सुरेश वाघे यांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले तेव्हा एका गोधडीत महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृत महिलेच्या पतीच्या शोधासाठी मंडणगड तालुका व रायगड जिल्ह्याचा खाडीकिनारीचा भाग पिंजून काढला. सापळा रचून त्याला अटक केली.

Web Title: murder in mandangad