किराणा-ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीने रसिक तृप्त!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

रत्नागिरी - किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचा मिलाफ आणि स्वरांची अवीट गोडी चाखण्याचे भाग्य रत्नागिरीकर रसिकांना लाभले. सुप्रसिद्ध गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या सादरीकरणाने कान तृप्त झाले आणि आयुष्यभर स्मरणात राहणारी मैफल अनुभवता आली, अशा प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केल्या. परदेशी कलाकार ताकाहिरो आराही यांच्या संतूरवादनानेही रसिकांना अनोखी पर्वणी लाभली. निमित्त होते आर्ट सर्कल आयोजित दहाव्या कला संगीत महोत्सवाचे. थिबा राजवाड्याच्या प्रांगणात अत्यंत चैतन्यदायी वातावरणात महोत्सवाचा तिसरा दिवस गाजला. ९ फेब्रुवारीला येथे झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

रत्नागिरी - किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचा मिलाफ आणि स्वरांची अवीट गोडी चाखण्याचे भाग्य रत्नागिरीकर रसिकांना लाभले. सुप्रसिद्ध गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या सादरीकरणाने कान तृप्त झाले आणि आयुष्यभर स्मरणात राहणारी मैफल अनुभवता आली, अशा प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केल्या. परदेशी कलाकार ताकाहिरो आराही यांच्या संतूरवादनानेही रसिकांना अनोखी पर्वणी लाभली. निमित्त होते आर्ट सर्कल आयोजित दहाव्या कला संगीत महोत्सवाचे. थिबा राजवाड्याच्या प्रांगणात अत्यंत चैतन्यदायी वातावरणात महोत्सवाचा तिसरा दिवस गाजला. ९ फेब्रुवारीला येथे झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. संगीत महोत्सवात रोणू मुजुमदार, काद्री गोपालनाथ यांची जुगलबंदी, परवीन सुलताना यांची सदाबहार गायकी आदी कार्यक्रमांनी दोन दिवस रसिकांच्या मनावर गारुड केले. सांगतेच्या दिवशी व्यंकटेशकुमारांनी महोत्सवावर कळस चढविला. त्यांनी मैफलची सुरवात छायानट रागातील ‘एरी अब तुम आओ’ या विलंबित एकतालातील ख्यालाने केली. त्याला जोडून ‘झनन झनन झन’ ही द्रूत त्रितालातील बंदिश, दुर्गा रागातील झपतालातील ‘सखी मोरी रूम झूम’ ही बंदिश, त्यालाच जोडून तराणा सादर केला. त्यानंतर सोहोनी रागातील त्रितालातील ‘काहे करत’ ही बंदिश, बसंत बहार रागातील बंदिश सादर केली, मैफलची सांगता दादरा तालातील ‘शाम सुंदर मदन मोहन’ या भैरवीने केली. अजय जोगळेकर यांनी संवादिनीसाथ केली.

फेसबुकवर लाईव्ह
या कार्यक्रमातील काहीअंश फेसबुकवर लाईव्ह केल्यामुळे जगभरातील अनेक श्रोत्यांना ताराहिरो व व्यंकटेशकुमार यांच्या सादरीकरणाचा आनंद लुटता आला. संगीत महोत्सवात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला. मिरा म्युझिकच्या अजय दिंडे यांनी प्रकाशझोताबाहेर असलेल्या जुन्या कलाकारांचा ठेवा जतन करण्यासाठी सीडी प्रकाशित केली आहे. कुर्धे येथील राष्ट्रपतीपदक विजेते गणेशबुवा बेहेरे यांच्या संगीताची सीडी पं. व्यंकटेशकुमार व जोगळेकर यांच्या हस्ते प्रकाशित केली. मध्यंतरामध्ये आर्ट सर्कलला दहा वर्षे मदत करणाऱ्यांचे सत्कार केले.

Web Title: musin mahotsav in ratnagiri