कारनामे बाहेर पडतील म्हणूनच उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून : नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना कधीही चालविली गेली नाही तर केवळ सत्तेच्या माध्यमातून आपल्या तुुंबड्या भरण्याचे काम आणि दुकान चालविण्याचे काम ठाकरेंकडून करण्यात आले

सावंतवाडी : सत्तेतून बाहेर पडलो तर आपल्याला अटक होईल, आपले कारनामे बाहेर पडतील, अशी भीती असल्यानेच उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून बसले आहेत, असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी येथे संघर्ष यात्रा समारोप कार्यक्रमात केला.

कोकणात जागृत देवस्थाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात आला, अशा स्तुत्य उपक्रमाचा शेवट चांगला होवून कर्जमाफी झालीच पाहीजे, असे गार्‍हाणे घालत माजी मुख्यमंत्री राणे यांनी आज येथे संघर्ष यात्रेचा समारोप केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप आज येथे करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, देवेंद्र कवाडे, सुनील केदार, नितेश राणे, किरण पावसकर, जितेंद्र आव्हाड, रुकसाना खलीफे, दत्ता सामंत, सतिश सावंत, संजू परब, प्रविण भोसले, सुरेश दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. राणे म्हणाले,“सत्तेत राहून कामे होत नाहीत असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. लोकांना फसविण्याचे काम हे लोक करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना आणि प्रकल्प या ठिकाणी आणण्यात आले; मात्र त्यातील एकही प्रकल्प पूर्ण करणे सोडाच तो सुरू करण्याचे प्रयत्न पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेले नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना कधीही चालविली गेली नाही तर केवळ सत्तेच्या माध्यमातून आपल्या तुुंबड्या भरण्याचे काम आणि दुकान चालविण्याचे काम ठाकरेंकडून करण्यात आले.”

ते म्हणाले,“या ठिकाणी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी आम्ही एकत्र आलेलो असताना या यात्रेला अशोक चव्हाण का आले नाहीत असा प्रश्‍न पत्रकारांकडून करण्यात आला. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. कोकणाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होत असताना राणे कोठे पाऊल ठेवतात, त्यांची बातमी केली जाते. मी कधी प्रसिध्दीसाठी हपापलेलो नव्हतो आणि नाही.”

यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्यावरही राणेंनी टीका केली. 'याला बोलता येत नाही, चालता येत नाही अशा माणसाला राष्ट्रवादीत कसा काय घेतला होता', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले,“केसरकर यांच्यामार्फत वाळू, चिरे वाहतूक करणार्‍या युवकांवर महसूल विभागाकडून कारवाई करुन हप्ते वसूल करण्याचे काम केले जात आहे.”