नरडवे पाटबंधारेचे काम लवकरच सुरू

नरडवे पाटबंधारेचे काम लवकरच सुरू

केंद्राच्या सिंचनमधून निधी - प्रकल्पग्रस्तांची बारमाही रस्त्याची मागणी 

कणकवली - प्रदीर्घ काळ निधीअभावी रखडून पडलेल्या नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी प्राप्त झाला असून, प्रकल्पग्रस्तांना मात्र बारमाही रस्ता वाहतुकीसाठी हवा, अशी मागणी आहे. त्यावर विचार सुरू असल्याचे मत सिंचन प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद रणखांबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा प्रस्तावही शासनदरबारी पडून आहे. मात्र, १९९६ ला भूमिपूजन झाल्यानंतर तत्कालीन युती सरकारच्या कालावधीत पाच वर्षे प्रकल्पाचे काम सुरू राहिले.

जवळपास ६० टक्के बंधाऱ्याचे बांधकाम झाले असून, स्वेच्छा पुनर्वसनही झाले आहे. प्रकल्पग्रस्तांना दिगवळे बामणदेववाडी आणि सांगवे तांबळवाडी येथे पुनर्वसन गावठणाचे भूखंड तयार करण्यात आले आहेत. परंतु, निधीअभावी २००२ पासून या प्रकल्पाचे काम बंद होते. त्यातच प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या असून, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संदेश पारकर असताना बुडीत क्षेत्राबाहेरील नरडवे घोलणवाडीसाठी बारमाही वाहतुकीची मागणी लक्षात घेऊन गडनदी पात्रावर छोटा कॉजवे मंजूर करण्यात आला होता. परंतु, निधीअभावी हे कामही रखडले होते. सद्यःस्थितीत काम बंद असले तरी हे काम पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नरडवे आणि अरुणा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, केंद्र शासनाने प्रधानमंत्री सिंचन योजनेतून राज्यातील २६ प्रकल्पांना निधी देण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला होता. हा निधी आता पाटबंधारे मंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ३२.४४ कोटी होती. सुधारित किंमत ४५० कोटी आहे. आता पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी छोटी कामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पाचे काम आर. एन. नायक या कंपनीकडे सोपविण्यात आले होते.

प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेतल्या आहेत. हा प्रकल्प सुरू व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. काही अडचणी आहेत, त्या सोडविल्या जातील. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात बारमाही वाहतुकीची मागणी आहे. स्थानिकांना वाहतुकीची अडचण असल्याने त्यांची मागणी रास्त आहे. याबाबतही सकारात्मक पर्याय शोधला जात आहे. 
- प्रमोद रणखांबे, उपकार्यकारी अभियंता, सिंचन प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com