सेना-राष्ट्रवादीचे राजकारण खोकेधारकांच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

चिपळूण : कोंढे फाट्यावर उभारण्यात आलेला ध्वजस्तंभ बेकायदेशीर असल्याने काढून टाकावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती, त्याप्रमाणे बांधकाम विभागाने कारवाई करत ध्वजस्तंभ काढला. त्यानंतर कोंढे फाट्यावरील अनधिकृत खोके हटविण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली. त्याबाबतही बांधकाम विभागाने कार्यवाहीला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रंगलेले शह-काटशहाच्या राजकारण कोंढे फाट्यावरील छोट्या खोकेधारकांच्या मुळावर आले आहे.
 
अनधिकृत ध्वजस्तंभाबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीला आमदार भास्कर जाधव यांचे बळ मिळाले. परिणामी, बांधकाम विभागाने एसआरपी जवान व पोलिसांचे संरक्षणात स्तंभ आणि चौथरा काढून टाकला होता. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढे फाट्यावर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली. शिवसैनिकांच्या मागणीला आमदार सदानंद चव्हाण यांनी पाठबळ दिले. शिवसेना अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी तगादा लावत आहे.
 
यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोंढे फाट्यावरील अनधिकृत खोकेधारकांना आठवडाभरापूर्वी नोटिसा देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने या परिसराची व खोक्‍यांची पाहणी केली. रस्त्यालगत असलेली खोकी अनधिकृत असून ती व्यावसायिकांनी सामंजस्याने काढावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे उपअभियंता धामापूरकर यांनी सांगितले आहे.
कोंढे फाट्यावर खोक्‍यांच्या मागे उभी राहात असलेली मोठी इमारत बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्या इमारतीवर प्रथम कारवाई करावी आणि नंतरच खोकेधारकांवर कारवाई करावी, अशी भूमिका येथील नितीन जाडे, विठ्ठल करंजकर, महादेव वाघे, रमेश शिर्के, रूपेश जंगम, जाफर चौगुले, गजानन उदेग, अजित राऊत, संदीप सोनार, तुकाराम जाधव, विश्‍वनाथ राऊत आदी खोकेधारकांनी घेतली आहे. तसे निवेदन या खोकेधारकांनी बांधकाम विभागाला दिले आहे. ही कारवाई अटळ असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केल्याने कोंढेतील वातावरण दूषित झाले आहे. राजकीय पक्षांच्या शह-काटशहाच्या खेळीत उदरनिर्वाहाचे साधन गमावून बसण्याची वेळ खोकेधारकांवर आली आहे.