राजीनामास्त्राची धार श्रेष्ठींनी केली बोथट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

रत्नागिरी - जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी राजीनामा अस्त्र काढले. पदाधिकाऱ्यांनीही तीच री ओढत सामुदायिक राजीनामा देण्याचा इशारा देत प्रदेशाध्यक्षांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला खरा, परंतु आठवडा उलटला तरी या अस्त्राचा प्रदेशाध्यक्षांवर काही परिणाम झालेल्या दिसत नाही. राजीनामा अस्त्राचा वार वाया गेला. या अस्त्राची धार श्रेष्ठींनी पार बोथट केली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कॉंग्रेस पक्षाला चांगले दिवस होते, ते शिवाजीराव जड्यार यांच्या काळामध्ये. आमदार म्हणून ते रत्नागिरीतून निवडून आल्यानंतर जिल्ह्यात कॉंग्रेस रुजली होती. तेव्हा भाजपनेदेखील आपली चांगली फळी उभी केली होती. कालांतराने मात्र कॉंग्रेसची जिल्ह्यावरील पकड हळूहळू निसटत गेली. दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या बरोबरीने जिल्ह्यात राष्ट्रवादीने हातपाय पसरले. तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. या काळात कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदांवरून जोरदार चढा-ओढ सुरू झाली. जिल्हाध्यक्ष पदावरून ऍड. सुजित झिमण पायउतार झाल्यानंतर रमेश कीर याची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, मात्र ही निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेत त्याला श्री. झिमण यांनी स्थगिती आणली. काही दिवसांत श्री. कीर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. ते दीर्घकाळ त्या पदावर होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे; परंतु त्यांच्याजागेवर नव्या अध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही. या दरम्यान पुलाखालून बरेच पाणी गेले. 

नारायण राणे यांनी शिवसेनेला राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्याच्याबरोबर काही आमदारही आले. कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर काहीशी राजकीय चमक त्यांनी दाखवली. पक्षाला पुन्हा उभारी येऊ लागली. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना उतरविल्यानंतर सेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव करून नीलेश राणे निवडून आले. त्यांनी प्रभावी कामगिरी करूनही पुढच्या निवडणुकीत ते विनायक राऊत यांच्यापुढे तग धरू शकले नाहीत. त्यानंतर कॉंग्रेसला अधोगतीच सुरू आहे. 

नाराजीचे वातावरण 
खासदारकीच्या काळात नीलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्याभोवती कार्यकर्ते जमा झाले होते, मात्र नंतर चिपळुणातील मारहाणप्रकरणात ते अडकल्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या घोडदौडीला लगाम बसला. यादरम्यानच्या काळात पक्षातील जुने-जाणते आणि निष्ठावंतांना चांगली वागणूक दिली गेली नाही, असा सूर आळवत नाराजीचे वातावरण तयार झाले. ते आजपर्यंत कायम राहिले. आता नीलेश यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. त्याला जिल्ह्यात पाठिंबा मिळाला, मात्र याबाबत अद्याप कार्यवाही काहीच झालेली दिसत नाही.

Web Title: nilesh rane politics