सभापतिपद डोळ्यांसमोर ठेवून रत्नागिरीत रंगणार राजकारण

सभापतिपद डोळ्यांसमोर ठेवून रत्नागिरीत रंगणार राजकारण

रत्नागिरी - रत्नागिरी पंचायत समिती सभापतिपदासाठी इतर मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. याला अनुसरून फणसोप, गोळप, हातखंबा गणात आरक्षण पडले असले तरीही सर्वसाधारण महिला गणातूनही काही इतर मागास प्रवर्गातील महिलांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांना सभापतिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यादृष्टीने राजकीय घडामोडी रंगणार आहेत. फणसोप, गोळपमधील उमेदवार जाहीर करताना आरक्षण डोळ्यांसमोर ठेवण्यात येणार आहे.

तालुक्‍यातील नऊ गणांतील उमेदवार अद्यापही जाहीर केलेले नाहीत. यापूर्वी सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. नवीन आरक्षणात इतर मागासवर्गीय महिलेला संधी मिळणार आहे. यापूर्वी २००२ ला असे आरक्षण पडले होते. त्यानंतर २००७ आणि २०१२ ला सर्वसाधारण महिलांना संधी मिळाली. सोळा वर्षांनंतर इतर मागास प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. रत्नागिरी तालुक्‍यात शिवसेनेचे प्राबल्य आहे. शिवसेनेमध्ये सभापतिपद डोळ्यांसमोर ठेवून राजकीय प्यादी पुढे सरसावली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. इतर मागासच्या महिला उमेदवार नव्यानेच  रिंगणात आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या वजनाला महत्त्व आहे.

शिवसेनेकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये हातखंबा गणातून साक्षी रावणंग, वरवडेतील मेघना पाष्टे, मिरजोळेतून विभांजली पाटील, हरचेरीतील विभा भातडे यांचा समावेश आहे. उर्वरित देऊड, गोळप, फणसोप येथील जागांवरील उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. यामध्ये गोळप, फणसोपला इतर मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षण आहे. फणसोपमधून प्राजक्‍ता पाटील आणि सौ. राधिका साळवी यांच्यात चुरस आहे. गोळपमधून चार महिलांची नावे आहेत. त्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईक महिलांचा समावेश आहे. आरक्षण लक्षात घेऊनच येथील उमेदवारांची फिल्डिंग लावली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित गणातून मिरजोळेत वैभव पाटील यांच्या आई विभांजली पाटील यांना संधी दिली आहे. सुदैवाने सभापतिपदही पूरक पडल्याने प्रमुख दावेदारी त्यांना करता येणार आहे. यापूर्वी मिरजोळे गणातील सदस्याला सभापतिपदावर नियुक्‍ती मिळालेली नाही. शिवसेनेला सत्ता मिळाली तर निश्‍चित त्यांचा विचार होऊ शकतो. तसेच आमदार उदय सामंत यांचे समर्थक बाबू म्हाप यांच्यासाठी वैभव पाटील यांनी माघार घेतली असल्याने पाटील यांच्या आईला ही संधी दिली जाऊ शकते. पंचायत समितीच्या निवडणुकांचे राजकारण सभापतिपदाची खुर्ची डोळ्यांपुढे ठेवूनच रंगणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com