पेंडूर पुलाला भगदाड पडल्याने धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

सावंतवाडी : पेंडूर येथील वन विभागाची चौकी ते सातवायंगणीदरम्यान असलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे पादचारी, तसेच वाहनांना ये-जा करण्यासाठी हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्‍त असून, ऐन चतुर्थी हंगामात पुलाची समस्या आवासून उभी आहे.
 

सावंतवाडी : पेंडूर येथील वन विभागाची चौकी ते सातवायंगणीदरम्यान असलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे पादचारी, तसेच वाहनांना ये-जा करण्यासाठी हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्‍त असून, ऐन चतुर्थी हंगामात पुलाची समस्या आवासून उभी आहे.
 

पेंडूरमधील वन विभागाच्या चौकीपासून सातवायंगणी नेवाळे येथे जाताना मधेच पुलाचा मार्ग येतो. या पुलाला अचानकपणे एका बाजूला भगदाड पडलेले ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दोन दिवस होताच या पुलाला दुसऱ्या बाजूनेही भगदाड पडले. त्यामुळे या पुलावरून वाहतूक, तसेच ये-जा करणेही ही धोकादायक बनले आहे. या पुलाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 2008 मध्ये ग्रामपंचायतीतर्फे झाले होते. संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामाचा त्रास आता वाहनधारकांना होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पुलाखालून मोठ्या प्रमाणावर पाणी जात असते. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते. ग्रामस्थांनी हे पूल धोकादायक असल्याची जाणीव, तसेच दुरुस्तीची मागणी वारंवार ग्रामपंचायतीमार्फत शासनाकडे केली होती; मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्षच केले गेले. पुलाच्या पलीकडच्या परिसरात सुमारे 300 लोकवस्ती आहे. मळेवाड, शिरोड्याला जवळचा पर्यायी मार्ग म्हणून, तसेच रेल्वेस्थानकाकडे येण्यासाठी धाकोरा, आजगाव, मळगाव येथील बऱ्याच वाहनांची वाहतूक येथून होते. यामध्ये काही वेळा अवजड वाहनांचाही सामावेश असतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी भगदाड पडलेल्या या पुलाचा वापर आता धोकादायक बनला आहे. काल (ता. 16) या पुलाची पाहणी वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी शिवसेना शाखाप्रमुख राजू मेस्त्री, ग्रामसेवक परुळेकर, प्रशांत शिरोडकर, प्रमोद शिरोडकर, राकेश शेटये, शुभम वैद्य, पांडुरंग नाईक, मनोज वैद्य आदी उपस्थित होते.