मद्यपी वाहनचालकही आता जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मालवण : मद्य पिऊन वाहन चालविल्याने होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी मोठ्या वाहनचालकांबरोबर आता दुचाकीस्वारांचीही पोलिसांकडून तपासणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यास मद्य पिल्याची चाचणी करणारे तपासणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांना या यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक तालुक्‍यात याच्या कडक अंमलबजावणीस आजपासून सुरवात होणार आहे. 

महामार्गावर होणाऱ्या अपघातांची वस्तुस्थिती पाहता अनेक अपघात हे मद्यपी वाहनचालकांमुळेच झाल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गावर पोलिसांकडून मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची यंत्राद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार मुख्य रस्त्यांवर प्रत्येक वाहनचालकांची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येत होती. सुरवातीस याची अंमलबजावणी केवळ महामार्गावरच प्रभावीपणे करण्यात येत होती; मात्र मोठ्या वाहनचालकांबरोबरच दुचाकींच्या अपघातातही मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मोठ्या वाहनचालकांबरोबरच आता दुचाकीस्वारांचीही तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना मद्य पिल्याची चाचणी करणारे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या यंत्राची हाताळणी करण्यासाठी त्या त्या पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या यंत्रात मद्यपी दुचाकीस्वाराचे छायाचित्र घेण्याबरोबर त्याने मद्य पिले आहे की नाही याची चाचणी होणार आहे. त्याचबरोबर संबंधित दुचाकीस्वाराची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित दुचाकीस्वारास कारवाईसाठी थेट न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मद्यपी दुचाकीस्वारांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अपघातांना रोखण्यास मदत मिळणार आहे. तालुक्‍यात मोठ्या वाहनांबरोबरच दुचाकीस्वारांच्या तपासणीस पोलिसांनी आजपासून सुरवातही केली आहे.