खोपोली नगरपालिकेत घोडेबाजार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य होण्यासाठी रस्सीखेच   

खोपोली - खोपोली नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन औसरमल थेट निवडून आल्या असल्या, तरी २९ सदस्यसंख्या असलेल्या या नगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. या स्थितीत शनिवारी (ता. ३१) होत असलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व स्वीकृत सदस्य नियुक्‍तीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. यातून मोठा घोडेबाजार उधळण्याची चिन्हे आहेत.

उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य होण्यासाठी रस्सीखेच   

खोपोली - खोपोली नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन औसरमल थेट निवडून आल्या असल्या, तरी २९ सदस्यसंख्या असलेल्या या नगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. या स्थितीत शनिवारी (ता. ३१) होत असलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व स्वीकृत सदस्य नियुक्‍तीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. यातून मोठा घोडेबाजार उधळण्याची चिन्हे आहेत.

नगरपालिकेत १० सदस्य असलेल्या शिवसेना व तितकेच सदस्य असलेल्या राष्ट्रवादीतून स्वीकृत सदस्य होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे या पदासाठीही मोठीच स्पर्धा सुरू आहे. निवडीसाठी शनिवारी विशेष सभा होणार आहे.

औसरमल या राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या नगराध्यक्ष आहेत. आघाडीत राष्ट्रवादीचे १० व शेकापचे तीन, एक अपक्ष असे १४ सदस्य  आहेत.

दुसरीकडे शिवसेना १०, काँग्रेस दोन, भाजप तीन व एक अपक्ष असे बलाबल आहे. उपनगराध्यक्षपदासाठी कमीत कमी १५ सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. राष्ट्रवादी-शेकाप-अपक्ष आघाडीचे संख्याबळ १४ आहे.  त्यांना आणखी एका सदस्याच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेसचे दोन्ही सदस्य शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे तीन सदस्य शिवसेनेला मदत करतील की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. अपक्ष नगरसेवक किशोर पानसरे राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या बाजूने राहण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत उपनगराध्यक्षपदासाठी कोणता पक्ष कोण उमेदवार देतो व आर्थिक गणितात कोण सक्षम ठरतो, त्यानुसार स्थिती बदलणार आहे.

स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी भाव फुटला आहे! जो सदस्य कमीत कमी दहा लाख खर्च करू शकतो तोच या पदावर जाऊ शकतो, अशी स्थिती आहे.

दुसरीकडे उपनगराध्यक्षपदासाठी कमीत कमी २० लाखाचा ‘खर्च’ अपेक्षित आहे. अशा स्थितीत दोन्ही पदांसाठी घोडेबाजार होणे निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

शक्‍यतांचे राजकारण 
 राष्ट्रवादीकडून कुलदीपक शेंडे यांना उपनगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यास भाजपचे एक मत त्यांना मिळण्याची शक्‍यता. 

काँग्रेसचे दोन सदस्य कोणत्या नावाला पसंती देतात, त्यानुसार शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. सुनील पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

शिवसेना व काँग्रेसमध्ये समझोता होऊन शिवसेनेने काँग्रेसचे बेबी सॅम्युअल यांना पाठिंबा देल्यास उपनगराध्यक्षपदासाठी प्रचंड घोडेबाजार होणार आहे. 

राष्ट्रवादी-शेकाप व अपक्ष अशी आघाडी आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे योग्य वेळी जाहीर केली जातील. आमचा प्रयत्न घोडेबाजार टाळण्याचा आहे. सहमतीने या निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- सुरेश लाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस. 

सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडे पूर्ण बहुमत नाही. अशा वेळी विरोधी पक्षाची भावना त्यांना लक्षात घ्यावी लागेल. तसे न झाल्यास उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यासाठी मतदान अटळ आहे. शिवसेनेची सदस्यसंख्या १० आहे. सभागृहात काँग्रेसच्या दोन व भाजपच्या तीन सदस्यांची साथ आम्हाला मिळेल. 
- सुनील पाटील, शिवसेना नगरसेवक व शहरप्रमुख.

Web Title: politics in khopoli municipal