रायगड: घेतला वसा दुर्ग संवर्धनाचा

raigad
raigad

पाली : सुधागड किल्ला हा ऐतिहासिक दृष्टया अतिशय महत्वाचा किल्ला आहे. या किल्ल्याचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी तालुक्यातील स्वराज्य युवा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. नुकतेच फाउंडेशनच्या युवा सदस्यांनी सुधागड किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गाची साफसफाई  करून गडावर जाणाऱ्या पायऱ्या दुरुस्त केल्या.

सुधागड किल्यावर जाणाऱ्या पायऱ्या ठिकठिकाणी मोडकळीस आल्या आहेत. किल्यावर जाणाऱ्या दुर्गप्रेमींना आणि पर्यटकांची यामुळे मोठी गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी व किल्ल्याकडे जाणारा मार्ग सुकर होण्यासाठी तसेच किल्याचे संवर्धन करण्यासाठी स्वराज्य युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य मागील चार वर्षांपासून स्व परिश्रमाने व स्व खर्चाने किल्यावर जाणाऱ्या मार्गाची साफसफाई करून पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम करत आहे. आत्ता पर्यंत स्वराज्य युवा फाउंडेशनच्या माध्यमातून किल्ल्यावर जाणाऱ्या 21 मोठ्या पायऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आपला इतिहास व आपल्या ऐतिहासिक ठेव्याची आपणच देखभाल करायला पाहिजे. कारण या किल्ल्यांमुळे इतिहास जिवंत आहे. असे स्वराज्य युवा फाउंडेशनचे मत आहे.

सुधागड, ऐतिहासिक वारसा
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव होते. पूर्वी या गडाला भोरपगड किंवा भोरप्याचा गड असेही म्हणत असत. भोराई देवीचे मंदिर किल्यावर आहे. त्यामुळे या किल्ल्यास भोराई किल्ला असेही म्हणतात. शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. इ.स. १६४८ साली हा किल्ला शिवाजीच्या राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवाजी महाराजांनी केला होता, असे सांगितले जाते. स्वराज्यात असताना या किल्ल्याला विशेष महत्व होते.  या किल्ल्याच्या नावावरुनच सुधागड तालुका नाव आले.

संवर्धनाची गरज
पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष आणि नैसर्गिक कारणांमुळे हा किल्ला आता ढासळायला लागला आहे. जागोजागी तटबंदीवर (बुरुजावर) झाडे झुडपे उगवल्याने त्यांची हानी होत आहे. गडावरील विरगळ विखुरलेल्या अवस्थेत आहेत. गडावर असणाऱ्या समाध्या काटेरी झुडुपाने वेढल्या आहेत. गडाचे बांधकाम करताना वापरलेले जाते, उखळ सुद्धा पडीक अवस्थेत आहे. गडावर असणारे पाण्याचे टाके गाळाने भरून गेले आहे. त्यामुळे काही दिवसांनी गडावर आलेल्या दुर्गप्रेमींना पाण्याची सोय होईल कि नाही हा मोठा प्रश्न आहे. अशा अनेक समस्या या गडाच्या आहेत. या किल्लाकडे पूरातत्व विभाग लक्ष देईल काय ? किल्ला नामशेष होत आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष द्यायला पिहिजे अशी मागणी  स्वराज्य युवा फाउंडेशनने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com