या निवडणुकित शिवसेनेची एकला चलोची भूमिका

अमित गवळे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढविणार- जिल्हाप्रमुख प्रकाश देसाईंची घोषणा

पाली : जिल्ह्यात पुढल्या महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना स्बळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सोमवारी (ता. 25) केली. पालीतील शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांप्रमाणेच शिवसेना येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील नंबर एकचा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वास देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. सुधागड तालुक्यात 14 आक्टोंबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरु झाली आहे.  शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई व सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, संपर्क प्रमुख विनेश सितापराव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

यावेळी प्रकाश देसाई म्हणाले की सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच राज्याचे उर्जा विभाग सचिव, आरोग्य विभाग सचिव यांच्या उपस्थितीत महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी सुधागड तालुक्यातील परळी, पेडली व डोंगरपट्ट्यातील गावांत सातत्याने विद्यूत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याची बाब प्रकाश देसाई यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर परळी, पेडली विभागाला होणार्‍या अनियमीत विद्युत पुरवठ्यासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोणातून निर्णय घेण्यात आला. यामध्ये टॉपवर्थ कंपनीला ज्या ठिकाणावरून विद्युत पुरवठा केला जातो तेथुनच परळी पेडली विभागातील नागरीकांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे येथील विज समस्या कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणार्‍या कर्मचार्‍या अभावी मृतदेहाची हेळसांड होत होती. या बैठकीत निर्णय होवून पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी शवविच्छेदन कर्मचार्‍याची अधिकृत शासकीय नेमणुक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख देसाई यांनी यावेळी दिली.

अनंत गितेंच्या माध्यमातून आदिवासी विकास, दलीत वस्ती सुधारणा आदिंसह विविध लोकाभिमुख व जनकल्याणकारी कामे प्रगतीपथावर आहेत.  आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त शिवसेनेचे सरपंच सत्तेत विराजमान झालेले दिसतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.  शिवसेनेतून नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक यांच्यासारखे मोठ मोठे मातब्बर नेते बाहेर पडले. मात्र शिवसेना दिवसागणिक संघटनात्मकदृष्ट्या वाढतच असल्याचे जिल्हाप्रमुख देसाई म्हणाले.  येत्या डिसेंबरपासून शिवसेनेचे सामाजिक सांस्कृतीक उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतले जाणार असून पाच जिल्ह्यांचा समावेष असलेल्या कोकण प्रो कबड्डी सामण्यांचे आयोजन केले जाणार आहे असे देसाई यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, जि.प सदस्य रविंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य नंदू सुतार, सुधागड तालुका शिवसेना प्रमुख मिलिंद देशमुख, सुधागड तालुका संघटक निलेश अवसरे, सुधागड तालुका संपर्क प्रमुख विनेश सितापराव, महिला संघटक आश्विनी रुईकर, मनोहर  देशमुख, सुनिल झुंजारराव, शिवराम पवार, विधानसभा समन्वयक आशिष यादव, किशोर दिघे, अनंता पाठारे, विलास बुरुमकर आदिंसह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थीत होते. 

 

Web Title: raigad news gram panchayat elections shiv sena